प्रशांत शर्मा, झी मीडिया, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सातवीत शिकणाऱ्या किरण सोनवणे या विद्यार्थ्याचा वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत काल मृत्यू झाला. याप्रकरणी 11 अल्पवयीन मुलांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी नूतन माध्यमिक विद्यालयातील किरणला वर्गातील 5 मुलांनी बेदम मारहाण केली होती.
संगमनेर तालुक्यातल्या सातवीत शिकणाऱ्या किरण सोनवणे या विद्यार्थ्याचा वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाय. मुलीकडे का बघतो म्हणून वर्गातल्या दहा ते बारा विद्यार्थ्यांनी किरणला सिनेस्टाईल मारहाण केली. किरणचं डोकं बेंचवर आदळलं. त्यात त्याच्या मेंदुला दुखापत झाली आणि उपचारादरम्यान किरणचा मृत्यू झाला.
मृत किरणच्या तक्रारीनंतर संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये 11 अल्पवयीन मुलांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तर मारहाणीचा हा प्रकार शाळेत घडलाच नाही आणि तशी तक्रारही आमच्याकडे आली नसल्याचं प्राचार्यांनी सांगितलंय.
गेल्याच आठवड्यात जळगावात विद्यार्थ्यांच्या भांडणात एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला होता आणि आता संगमनेरमध्येही असंच प्रकरण समोर आलाय. असे प्रकार वारंवार का होतात यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात विचार होणं गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.