मुंबई : भाजपचे माजी नेते प्रमोद महाजन यांची वहिनी सारंगी महाजन यांनी आता शनी शिंगणापूरच्या वादात उडी घेतलीय.
या वादात स्पष्टपणे भूमिका घेणारा आणि राजकीय पार्श्वभूमी असणारा हा पहिलाच चेहरा आहे. मात्र अनपेक्षितरित्या सारंगी यांनी शनी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची बाजू घेत महिलांना मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेतलीय.
नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अधिक चर्चेत आलेल्या वादग्रस्त 'सनातन संस्थे'शी हातमिळवणी करत सारंगी महाजन यांनी शनी वादात एक स्वाक्षरी मोहीमही सुरु केलीय. सोबतच, लातूरच्या मराठा महासंग्राम, अखिल भारतीय सोनार समाज तसंच शनी शिंगणापुरातल्या स्थानिक पंचक्रोशी महिला संघटनेलाही त्यांनी हाताशी धरलंय.
शनी शिंगणापूरच्या वादात घेतलेली उडी हा राजकारणात शिरकाव करण्याचा मार्ग आहे का? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. तेव्हा, 'राजकारण ही काही केवळ महाजन आणि मुंडे घराण्याची मक्तेदारी नाही', असं त्यांनी म्हटलंय.
मी लहानपणापासून आरएसएस आणि भाजपमध्ये कार्यरत आहे. मी याअगोदरही भाजप पक्षाचं काम केलंय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नव्या नियमांनुसार, कोणत्याही कार्यरत सदस्याला १०० सहकाऱ्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या पक्षाच्या कार्यालयात देणं गरजेचं आहे. मी ही प्रक्रिया पूर्ण केलीय, असंही सारंगी महाजन यांनी म्हटलंय.
सारंगी या प्रमोद महाजन यांचा भाऊ आणि मारेकरी प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. नोव्हेंबर २०१५ रोजी ठाण्याच्या तुरुंगात प्रमोद महाजन यांच्या हत्येची शिक्षा भोगत असतानाच प्रवीण महाजन यांचा मृत्यू झाला होता.