अमित शाहना गडकरींचा काटशह, वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत : गडकरी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे वेगळ्या विदर्भाबाबत आश्वासन दिले नव्हते, असे सांगत अखंड महाराष्ट्र राहिल, असे स्पष्ट केले. त्यामुळे विदर्भ नेत्यांना चांगली चपराक बसली.

Updated: May 28, 2015, 03:28 PM IST
अमित शाहना गडकरींचा काटशह, वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत : गडकरी title=

नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे वेगळ्या विदर्भाबाबत आश्वासन दिले नव्हते, असे सांगत अखंड महाराष्ट्र राहिल, असे स्पष्ट केले. त्यामुळे विदर्भ नेत्यांना चांगली चपराक बसली. मात्र, अमित शाह यांना काटशह देण्याचा प्रयत्न केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. भुवनेश्वर येथील अधिवेशानात वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत केल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. ते एवढ्यावर न थांबता म्हणालेत, आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत.

केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह यांनी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन आम्हीच दिलेच नव्हते, असे स्पष्ट केले. त्याचे विदर्भात तीव्र पडसाद उमटले. विदर्भवाद्यांनी शाह यांच्यावर तोफ डागून निषेध केला.

यासंदर्भात गडकरी यांना प्रश्न केला गेला. त्यावेळी ते म्हणालेत, १९९३ मध्ये भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीत वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवर भाजप ठाम आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. अमित शाह यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे, असेही गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

आम्ही सौहार्दपूर्ण वातावरणात तीन राज्यांची निर्मिती केली. काँग्रेसने तेलंगणा करताच त्याला हिंसक वळण लागले. आम्ही लहान राज्यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. संसद आणि राज्यात दोन तृतीयांश बहुमत आल्यानंतर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यात घेण्यात येईल. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने सद्यस्थितीत हा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलेय.

वेगळ्या विदर्भाबाबतचे अमित शाह यांचे वक्तव्याने वैदर्भीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असे सुलेखा कुंभारे म्हणाल्यात. तर ​वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. या घुमजावबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे  किशोर तिवारी यांनी केलेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.