शिर्डी : शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल चार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संस्थानने गेल्या शंभर वर्षात मंदिर परिसरातील अनेक जागांचे अनधिकृत हस्तांतरण आणि शर्तभंग केल्याची बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आलीय.
या पार्श्वभूमीवर राहता तहसीलदारांनी ही नोटीस बजावलीय. आगामी सहा महिन्यांनंतर साई समाधी शताब्दी सोहळा सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डीतील पत्रकार प्रमोद आहेर हे ‘शिर्डी गॅझेटिअर’ या संदर्भ ग्रंथासाठी मंदिर आणि परिसराची माहिती घेत होते. त्यावेळी उप विभागीय अधिकारी कुंदन सोनवणे यांच्या निदर्शनास ही बाब आली़.
त्यानंतर संस्थानच्या ताब्यातील विशेषत: मंदिर आणि परिसरातील मोफत सर्व्हे क्रमांक एकमधील अनेक जागांचे हस्तांतरण अनधिकृतपणे झाल्याचे समोर आलंय. ही जागा नियमानुकूल करण्यासाठी सरकारकडे मूल्यांकनाच्या 75 टक्के म्हणजेच चार कोटी जमा करणं आवश्यक आहे. याबाबत सात दिवसांत खुलासा करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटीशीतून देण्यात आलाय.