नाशिक : नाशिक शहरात तापमानाचा पारा उच्चांक गाठत असल्याने नागरिकांच्या घामाच्या धारा निघत आहेत. माणसांसाठी उन्हाळा त्रासदायक ठरत असतानाच, काही नाशिककरांच्या पुढाकाराने उन्हाच्या तडाख्यातही चिमणी पाखरं निसर्गाचा आनंद घेताहेत.
शहरातील एका अपार्टमेंटमध्ये माणसं आणि चिमण्याच जास्त राहत आहेत. नाशिकच्या जनरल वैद्यनगरमधील हे आस्था अपार्टमेंट, अठरा फ्लॅटच्या ती मजली या अपार्टमेंटमध्ये चिमण्यांसाठी चाळीसहून अधिक घरटी लावण्यात आलीत.
या अपार्टमेंटमध्ये १८ फ्लॅट जरी असले तरी प्रत्यक्षात ९ ते १० कुटुंबच राहतात. त्यामुळे माणसं कमी आणि चिमण्याच जास्त असल्याने चिमण्यांची अपार्टमेंट म्हणून या इमारतीची ओळख झालीय.
खिडकी, गॅलरीच्या छताखाली, पार्किंगमध्ये, घरात, इमारतीच्या दर्शनी भागात सर्वत्र चिमण्याच चिमण्यात बघायला मिळतात. त्यामुळे दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. चिमण्यांना खाण्यासाठी फीडर, तहान भागविण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे.
चिमण्यांबरोबर या अपार्टमेंटमध्ये लाफिंग डव, सनबर्ड, रॉबिन, पारवा असे असंख्य पक्षी आपली तहान भागवण्यासाठी येतात. त्यामुळे सकाळ संध्याकाळ चिमण्यांच्या चिवचिवाटबरोबर इतर पक्षांचा किलबिलाटही ऐकायला मिळतो. पक्षांकरीता येथे असंख्य झाडेही लावण्यात आली आहेत.
सिमेंटच्या जंगलात राहून आपण माणुसकी विसरत चाललोय. माणूस माणसालाच वेळ देत नाही तर पक्षी प्राणी हे तर खूप दूर राहिले. मात्र निराशेच्या वाळवंटात असे एक दोन उदाहरण जरी पुढे आले तरी निसर्ग वाचविण्याची नवी प्रेरणा देऊन जातात.