तिच्या आयुष्यातली 'कॅन्सर'ची फ्रेम... एक प्रेरणादायी कहाणी!

कॅन्सर म्हटल्यावर आपण गळीतगात्र होऊन जातो. मात्र, याच कॅन्सरशी जिद्दीने लढा देत आपल्या भावनांपेक्षाही प्राण्यांच्या भावनांना आपल्या मनात आणि नंतर कॅमेरात टिपणारी एक अवलिया म्हणजे सोनाली जोशी...

Updated: Jan 20, 2017, 11:36 PM IST
तिच्या आयुष्यातली 'कॅन्सर'ची फ्रेम... एक प्रेरणादायी कहाणी! title=

नाशिक : कॅन्सर म्हटल्यावर आपण गळीतगात्र होऊन जातो. मात्र, याच कॅन्सरशी जिद्दीने लढा देत आपल्या भावनांपेक्षाही प्राण्यांच्या भावनांना आपल्या मनात आणि नंतर कॅमेरात टिपणारी एक अवलिया म्हणजे सोनाली जोशी...

आकर्षित करणारं सौंदर्य, तडफदार व्यक्तिमत्व, हसतमुख चेहरा, कल्पक मन आणि कामात एकदम चुणचुणीत हे सारं काही एकाच व्यक्तीमत्वामध्ये दिसून येतं ते सोनाली जोशीमध्ये...

नाशिकमध्ये राहणाऱ्या सोनालीला लहानपणापासूनच कलेची आवड...चित्र काढणं, कलाकुसर करण्यांचे धडे तिला तिच्या आजोबा आणि आईकडून मिळाले... शाळेत कायम हुशार असणाऱ्या सोनालीने अनेक पुरस्कारही पटकावले...

पुढे जाऊन आर्ट टिचरचा पेशा पत्कारत मुलांच्या विश्वात रमायला तिने सुरुवात केली...कलेच्या माध्यमातून मुलांच्या भावभावना ती जाणून घेऊ लागली आणि म्हणूनच आर्ट सायकोलॉजी शिकायचंय तिने ठरवलं... त्यातून 'आर्ट अॅन्ड यू' या वर्कशॉपचीही सुरुवात झाली... पुढे जाऊन फोटोग्राफी शिकायचं मनात आलं आणि त्यातून 'वाईल्ड लाईफ' फोटोग्राफीकडे ती वळली... त्यातूनच टांझानियाला जाण्याची संधी मिळाली आणि तिथे तिची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बहरु लागली होती... सारं काही सुरळीत चाललं होतं... मात्र कदाचित विधात्याला ते मान्य नव्हतं.

सोनालीकडून त्याला आणखी काहीतरी अपेक्षित होतं आणि म्हणूनच तिला कॅन्सर असल्याचं समोर आलं. मात्र हे समजताच सोनाली डगमगली नाही... कॅन्सर झाला त्या क्षणापासून त्याच्याशी लढण्याचा तिने पण केला... त्यात तिला साथ मिळाली ती तिच्या पतीची, मुलांची आणि तिच्या अख्ख्या कुटुंबाची... 

जवळपास ट्रीटमेंटचे तीन महिने सोनालीसाठी खूप कठीण काळ होता... मात्र त्यातही फोटोग्राफीमधलं तिचं मन तिला स्वस्थ बसू देत नव्हतं... ट्रीटमेट पूर्ण झाल्यानंतरही हातात कॅमेरा धरता येत नसूनही कुटुंबाच्या मदतीने तिने फोटोग्राफी केली. काही काळ गेल्यानंतर पुन्हा एकदा सोनाली जोमाने उभी राहिली. मात्र आता कॅमेरा, मुलांसाठी आर्ट ट्रेनिंग आणि त्यासोबतच कॅन्सरच्या प्रसारांची जबाबदारीही तिने आपल्या खांद्यावर पेलली आहे. सोनालीच्या या तडफदार कतृत्वाला आमचा सलाम...