तिरूपतीच्या धर्तीवर शिर्डीतही आता 'टाईमदर्शन'

तिरूपतीच्या धर्तीवर शिर्डीतही आता टाईमदर्शन सुविधा सुरू करण्यात आलीय. या महत्वाकांक्षी योजनेचं उद्घाटन आज करण्यात आलं.

Updated: Dec 12, 2016, 07:51 PM IST
 तिरूपतीच्या धर्तीवर शिर्डीतही आता 'टाईमदर्शन' title=

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून आता सुटका होणार आहे. तिरूपतीच्या धर्तीवर शिर्डीतही आता टाईमदर्शन सुविधा सुरू करण्यात आलीय. या महत्वाकांक्षी योजनेचं उद्घाटन आज करण्यात आलं.

शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आता तुम्हाला वेळेचं बंधन असणार आहे. कारण शिर्डीमध्ये टाईम दर्शन सुविधा सुरू झालीय. ज्यामध्ये नोंदणी केल्यानंतरच भाविकांना साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साईबाबा संस्थाननं टाईम दर्शन सुविधा सुरू केलीय. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी उदघाटन केलं आहे.

नोंदणी करण्यासाठी साईबाबा संस्थानच्या परिसरात 10 काऊंटर्स उघडण्यात आलेत. नोंदणी केल्यानंतर संस्थानातर्फे एक कार्ड देण्यात येईल ज्यावर भाविक कधी दर्शन घेऊ शकतील याची वेळ दिलेली असेल. दर्शनासाठी आता केवळ 15 मिनिटांचीच वेळ असेल. त्यामुळे सामान्य दर्शन बारी बंद होणार असून बायोमेट्रिक पद्धतीनं दिलेल्या पासद्वारेच भाविकांना दर्शन घ्यावं लागणार आहे.

टाईम दर्शन सुविधा सुरू झाली असली तरी त्याच्या अंमलबजावणीत ब-याचश्या अडचणी येत आहेत. आता सामान्य दर्शन रांग बंद होणार असली तरी संपूर्ण कुटुंबाला पास घेण्यासाठी टाईमदर्शन पासच्या रांगेत उभं राहावं लागणारेय. त्यामुळं सध्यातरी रांगेपासून सुटका नाहीच.