अहमदनगर : जवखेडामधल्या तिहेरी दलित हत्याकांडाला १४ दिवस उलटून गेले तरी अद्याप मारेक-यांना अटक होऊ शकलेली नाही. आरोपी अजूनही मोकाट असल्यानं परिसरात अजूनही तणावाचं वातावरण आहे.
आरोपींना तातडीनं अटक केली नाही, तर सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा जाधव कुटुंबियानं दिलाय. हे दलित हत्याकांड झाल्यानंतर झाडून सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राजेंद्र गवई, जोगेंद्र कवाडे, अजित पवार, माणिकराव ठाकरे, राज ठाकरे अशा नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली. एवढंच नाही तर प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, तातडीनं दोन मंत्र्यांचं शिष्टमंडळ जवखेड्याला पाठवलं.
महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जवखेडा इथं जाऊन पीडित कुटुंबीयांचं सांत्वन केलं. भाजपच्या वतीनं पीडित कुटुंबाला ५ लाखांची मदतही जाहीर करण्यात आलीय. पण अजूनही तपासात काहीही प्रगती होत नसल्यानं, पीडित जाधव कुटुंबाला न्याय मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय.
या प्रकरणाच्या तपासासाठी नाशिकचे पोलीस महानिरीक्षक गावात तळ ठोकून आहेत. पण तरीही हत्याकांडाचा सुगावा लागत नसल्यानं पीडित कुटुंबिय चिंतेत आहे. दरम्यान, या हत्याकांडाच्या निषेधार्थ जामखेडमध्ये 'बंद' पुकारण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.