मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बेभरवशी पावसानं जोरदार दणका दिलाय. मार्च महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालंय.
मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. यात जीवित हानीसह रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यात लातूर, बीड, उस्मानाबादेत अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.
सोलापूर् जिल्ह्यातल्या पंढरपूर परिसरात गापिटीचा फटका बसलाय. पुढील तीन दिवस विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय. परळी तालुक्यातील कौठळी शिवारात आवकाळी पावसात वीज कोसळून 2 ठार झाले आहेत. तर माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी, शिंदेवाडी, चोपणवाडी, वांगी या गावात दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. यात रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, खरबूज, ऊस आणि कापसाला सर्वात मोठा फटका बसलाय. तसंच अनेक गावांमधल्या शेकडो घरांचे पत्रे उडाल्यामुळं नुकसान झालंय.
लातूर शहरासह जिल्ह्यातल्या निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या काही भागांत, मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला. तसंच औराद शहाजनी, निटूर आणि केळगाव परिसरातही अवकाळी पाऊस बरसला. तर आज दुपारी लातूर शहर, औसा शहर आणि तालुक्यातल्या काही गावांत गारांसह जोरदार पाऊस बरसला.. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली. अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातल्या हरभरा, गहू पिकाला फटका बसलाय. मात्र असाच अवकाळी पाऊस राहिला तर ज्वारी काळी पडण्याची भीती व्यक्त होतेय. दरम्यान शेतक-यांनी काढणी केलेल्या हरभरा आणि गव्हाची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय.
लातूर सोबतच उस्मानाबादलाही अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं.. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यात तसेच मेंढा परिसरात वादळी वा-यांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली.. यापावसा सोबत गारपीटही झाल्यानं काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान झालंय..
पंढरपुरातही अनेक गावात वादळीवा-यांसह गारांचा पाऊस पडला.. या पासानं सरकोली, ओझेवाडी, परिसरात गारांचा अक्षरश: खच पडला होता.. या अवकाळी पावसाने द्राक्ष, ज्वारी, गहू पिकांचं मोठं नुकसान झालं.