नाशिक : झी २४ तास वृत्तवाहिनीवरच्या आपला सैनिक आपली दिवाळी या कार्यक्रमानं प्रेरित होऊन, नाशिक जिल्ह्यातल्या सैनिकाच्या कुटुंबियांसोबत गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. आदिवासी भागातल्या हर्सूल गावामधल्या तरुणांनी हा उपक्रम राबवला.
नाशिक शहरापासून ६० किलोमीटर अंतरावरचं हर्सूल गाव आणि येथे राहतं कोरडे कुटुंब. या कुटुंबाचे प्रमुख पुंडलिक कोरडे सीमेवर तैनात आहेत. सीमेवरच्या तणावग्रस्त स्थितीमुळे पुंडलिक कोरडे यंदा दिवाळीला घरी येऊ शकले नाहीत.
देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेल्या जवान पुंडलिक कोरडे यांच्या कुटुंबियांसोबत, हर्सूल गावातल्या तरुणांनी दिवाळी साजरी केली. ग्रामस्थांची ही बांधिलकी कोरडे कुटुंबाला सुखावून गेली.
झी 24 तासच्या आवाहनानुसार सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. सामाजिक बांधिलकी जपणारी अशी दिवाळी दरवर्षी प्रत्येकानं साजरी केली पाहिजे असं आवाहन या निमित्तानं आदिवासी गावातील या तरुणांनी केलं.