मुकूल कुलकर्णी, नाशिक : पुरोगामी महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या जातपंचायतीच्या जाचाची आणखी एक घटना उघड झालीय. अनैतिक संबंधांचा कलंक मिटवण्यासाठी कंजारभाट समाजातल्या विधवा महिलेला आणि तिच्या लहानग्या मुलाला अघोरी शिक्षेला सामोरं जावं लागत असल्याचं वास्तव समोर आलंय. या प्रकरणी 'अंनिस'नं उडी घेतलीय. जातपंचायतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
कंजारभाट समाजातल्या एका महिलेनं समाजाच्या जातपंचायतीचा भयावह चेहरा जगासमोर आणलाय. दोन वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीचं निधन झालं. पतीच्या निधनानंतर त्या किराणामालंच दुकान चालवत होत्या. दरम्यानच्या काळात नात्यातल्या एका तरूणाशी त्यांचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून त्यांची बदनामी करण्यात आली. निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जातपंचायतीने त्यांना भयावह शिक्षा सुनावली.
निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी महिलेला सर्वांसमोर निर्वस्त्र करून अंग झाकण्यासाठी एक कापडा पांढरा छोटासा तुकडा दिला जातो. आरोप असलेल्या महिलेला १०७ पावलं चालायला लावतात. त्याचवेळी अर्धा अर्धा किलो गव्हाच्या पिठाचे गोळे गरम करून तिला मारले जातात. त्याचबरोबर रूईच्या झाडाच्या आगीत गरम केलेल्या काठीने या महिलेला मारलं जातं. त्यानंतर तिच्या अंगावर दूध टाकून स्नानासाठी पाठवलं जातं.
एवढंच नाही तर आईचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तिच्या मुलालाही अघोरी शिक्षेला सामोरं जावं लागतं. रात्रभर तीनशे गोवर्या जाळून केलेल्या धगीत कुऱ्हाड तापवून लाल केली जाते. सकाळी सात वाजता रूईची पाच पाच पानं ठेऊन ती कुऱ्हाड मुलाच्या हातावर ठेवली जाते. मुलाच्या हाताला फोड आले तर महिला कलंकीत आहे असं समजलं जातं.
जात पंचायतीच्या या जाचाला कंटाळून ही महिला आपल्या माहेरी आली. त्यामुळे तिच्या माहेरच्या मंडळींनाही धमक्या दिल्या जात आहेत, अशी तक्रार पीडित महिलेनं दिलीय.
संबंधित मायलेकासोबतच ज्या तरूणावर हे आरोप आहेत त्याचीही गुढीपाडव्याच्या दिवशी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, त्याआधीच तरूणाला शिक्षा करून पापमुक्त केल्याने महिलेवरचा दबाव वाढतोय. आता या प्रकऱणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने लक्ष घातलंय.
जातपंचायतीसोबतच सासरच्या मंडळींकडूनही महिलेवर दबाव वाढतोय. या संदर्भात झी मीडियाने जातपंचायतीशीही संपर्क साधला. मात्र, त्यांनी पंचांनी प्रतिसाद दिला नाही.
'झी मीडिया'नं गेल्या काही महिन्यात काशीकापडी, गोंधळी समाजातील जातपंचायतीचा जाच समोर आणला होता. गोंधळी समाजाचं वृत्त पाहूनच या महिलेनं कंजारभाट जातपंचायतीविरोधात लढा देण्याचा निश्चय केलाय. आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष आहे.