चंद्रपूर : पुरोगामी महाराष्ट्रानं शरमेनं मान खाली घालावी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे.
शेतात काम करत असताना ६० वर्षांच्या बालाजी वाढई यांना साप चावला. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र तिथे सरकारी महिला डॉक्टर यमुना मडावी यांच्या उपस्थितीतच बालाजी वाढई यांच्यावर गावठी उपचार करण्यात आले.
डॉक्टर यमुना मडावी यांनी साप विषारी होता की बिनविषारी यावर काथ्याकूट करत, अडीच तास प्रथमोपचार केलेच नसल्याची तक्रार आहे.
हे कमी म्हणून की काय रुग्ण सहाय्यक सुरेश देशमुख यांना सांगून बालाजी वाढई यांचं विष मंत्रानं उतरवण्याचा प्रयत्नही केला गेला. याकरता त्यांना कडूलिंबाचा पालाही खाऊ घातला गेला.
हा सर्व प्रकार सीसीटीवीमध्ये कैद झाला. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे योग्य उपचार मिळू न शकल्यानं, अखेर उपजिल्हा रुग्णालयातच बालाजी वाढई यांचा मृत्यू झाला.