'त्या' नराधमाला दुहेरी फाशी - दुहेरी जन्मठेप!

यवतमाळ सत्र न्यायालयानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एका अवघ्या दोन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या शत्रुघ्न मसराम या आरोपीला कोर्टानं दुहेरी फाशी आणि दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावलीय. 

Updated: Aug 14, 2015, 08:19 PM IST
'त्या' नराधमाला दुहेरी फाशी - दुहेरी जन्मठेप! title=

यवतमाळ : यवतमाळ सत्र न्यायालयानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एका अवघ्या दोन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या शत्रुघ्न मसराम या आरोपीला कोर्टानं दुहेरी फाशी आणि दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावलीय. 

घाटंजी तालुक्यातल्या झटाळा गावी ११ फेब्रुवारी २०१३ रोजी ही घटना घडली होती. धक्कादायक म्हणजे, दोन वर्षाच्या मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून तिला अत्यंत क्रूरपणे ठार करणारा आरोपी हा मृत मुलीचा चुलत मामा होता. ही गोष्ट लक्षात येताच गावकऱ्यांनी या नराधम आरोपीला बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.
 
आजोबाच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुरडीला बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने घेऊन गेलेला शत्रुघ्न बऱ्याच उशिरापर्यंत परतला नव्हता. त्यामुळे धास्तावलेल्या चिमुरडीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. तेव्हा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजुला बांधकामावस्थेत असलेल्या अंगणवाडीमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ती बालिका निपचीत पडून होती... आणि तो नराधमही तिच्याच बाजुला पडून होता. हे दृश्यं पाहून उपस्थितांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना... चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत होती. तिच्या ओठांचे लचके तोडले गेले होते. गाल, हात व पार्श्वभागासह अनेक ठिकाणी तो नराधम चावल्यानं तिचं संपूर्ण शरीर जखमी झालं होतं.

आपल्याच भाचीचे लचके तोडणाऱ्या या नराधमास आज कोर्टानं वेगवेगळ्या कलमांखाली दुहेरी फाशी आणि दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.