युवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!

आपल्या 'युवा देशा'तील तरुणांनी विविध शिखरं पादाक्रांत केली आहेत. देश प्रगती करतोय... पण देशाचं भविष्य असणारी परंतु खेडेगावात, झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणारी हजारो मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच मुलांना शिकविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी सरसावले आहेत. ‘उपाय’ या संस्थेनं सुरू केलेल्या कार्यात असंख्य 'युवा स्वयंसेवक' घडलेत. शहर आणि परिसरातील १८ सेंटर्समध्ये तब्बल १२०० मुलांना शिकविण्याचं काम हे तरुण करतायत.

Updated: Jan 12, 2016, 01:11 PM IST
युवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!    title=

अपर्णा देशपांडे-कुकडे, नागपूर : आपल्या 'युवा देशा'तील तरुणांनी विविध शिखरं पादाक्रांत केली आहेत. देश प्रगती करतोय... पण देशाचं भविष्य असणारी परंतु खेडेगावात, झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणारी हजारो मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच मुलांना शिकविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी सरसावले आहेत. ‘उपाय’ या संस्थेनं सुरू केलेल्या कार्यात असंख्य 'युवा स्वयंसेवक' घडलेत. शहर आणि परिसरातील १८ सेंटर्समध्ये तब्बल १२०० मुलांना शिकविण्याचं काम हे तरुण करतायत.


'उपाय'

कोमेजलेल्या चिमुकल्यांना नवजीवन

गावांमध्ये आजही शिक्षणासाठी अनेक मुलांना संघर्ष करावा लागतोय. आपण अशा मुलांसाठी काही करावं याच इच्छेतून वरुण श्रीवास्तव या आयआयटी खरगपूरमधून शिक्षण घेतलेल्या तरुणानं ‘उपाय’ संस्थेची स्थापना केली. २००९ मध्ये नागपूर जिल्ह्यातील मौदाजवळील कुम्हारी गावात संस्थेचं पहिलं सेंटर सुरू झालं. गावातील शिक्षण सोडलेल्या, अत्यंत गरीब अशा ४-५ मुलांना शिकविण्यापासून त्यांचं कार्य सुरू झालं.

फुटपाथवर भरणारी शाळा
सप्टेंबर २०१४ साली नागपूर शहरात पहिली फूटपाथ शाळा सुरू झाली. शाळेचं पहिलं सेंटर बर्डीच्या फूटपाथवर भरलं... आज शहरात असे पाच सेंटर्स आहेत. बर्डी, यशवंत स्टेडियम, संत्रा मार्केट, एलआयसी चौक आणि रामनगर इथं या शाळा भरतात. जसजशी सेंटर्स वाढली तसतशी इथं या शाळेत शिकवण्यासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्याही वाढलीय.

आता इथं तब्बल १०० तरुण-तरुणी हे शिक्षादानाचं काम करत आहेत. तर मौदा आणि आसपासच्या गावात ५० जणं मुलांना शिकवतात. या स्वयंसेवकांमध्ये कॉलेजचे तरुण-तरुणी, इंजिनिअर्स, डॉक्टर्स, व्यावसायिक, पत्रकार आणि अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचा समावेश आहे.


'उपाय'

होमेश्वरी वडिखाये आणि आरती कडे या तरुणी स्वयंसेवकांपैकीच एक... दोघीही नोकरी करतात... पण आपल्या नोकरीसोबतच फूटपाथ शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याचं त्या काम करतात.

नागपुरात पहिलं सेंटर सुरू झाल्यानंतर लगेच ऑक्टोबर २०१४ पासून होमेश्वरीनं इथं शिकवायला सुरूवात केली. आपल्या शिक्षणाचा समाजासाठी काही उपयोग व्हावा म्हणून तिची धडपड सुरू आहे. होमेश्वरी शहरातील चार सेंटर्सवर मुलांना शिकविण्यासाठी जाते.

आरती कडे ही सुद्धा नोकरी करणारी तरुणी आहे. आपल्या ऑफिससोबत ती मुलांना शिक्षण देण्याचं काम करते.


उपाय

असं चालतं काम...

सकाळी ९ ते १०.३० आणि संध्याकाळी ५-७ अशी या शाळेची वेळ. काही सेंटर्समध्ये सकाळी तर काही ठिकाणी संध्याकाळी शाळा भरते. शाळेत या मुलांना प्रथम स्वच्छता, आरोग्य आणि मूल्य शिक्षणाचे धडे दिले जातात. त्यानंतर सुरू होतं शालेय शिक्षण... केजीचा पाठ मुलांना शिकवला जातो. मराठी, इंग्रजी अक्षरं समजण्या-लिहिण्यापासून सुरूवात होते.

मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांना चॉकलेट, नाश्ता, फळं खायला दिली जातात. त्यामुळं मुलं शाळेकडे आकर्षित होतात. दर रविवारी हे स्वयंसेवक स्वत: फूटपाथ आणि झोपडपट्टीतील आपल्या या विद्यार्थ्यांना आंघोळ घालतात. स्वच्छतेबाबत त्यांना जागरूक करतात.

संत्रा मार्केटच्या सेंटरमध्ये जवळपास ३६-४० विद्यार्थी सध्या आहेत. फूटपाथवर जिथं ही मुलं राहतात तिथंच ही शाळा भरते.

स्व-खर्चानं सुरू आहे काम
फुटपाथ शाळेत शिकवणारे स्वयंसेवक स्व-खर्चानं हे कार्य करतात. मुलांना लागणारे पुस्तकं, पाटी, पेन्सिल, पेन, रबर, वह्या सर्वच साहित्य स्वयंसेवक स्वत:चे पैसे गोळा करून त्यातून खर्च करतात. शिवाय आता जसजशी शहरातील लोकांना या उपक्रमाबाबत माहिती मिळतेय, तसे इतर लोकंही पैशाच्या रूपात किंवा शैक्षणिक साहित्याच्या रुपात उपाय संस्थेला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

प्रत्येक सण हे स्वयंसेवक आपल्या शाळेतील मुलांसोबत साजरा करतात. यंदा ख्रिसमसला सांताक्लॉजच्या टोप्या बनवून, नववर्षाचं कॅलेंडर बनवून त्याच्या विक्रीतून फंड गोळा करण्याचं कामही त्यांनी सुरू केलंय.

शिक्षणापासून वंचित असलेल्या चिमुरड्यांसाठी कार्य करणाऱ्या या तरुणालाईला सलाम!