www.24taas.com, ठाणे
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे फोडाफोडीचे राजकारण संपल्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणूक रणसंग्रामात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी गाजत आहेत. जनतेच्या प्रश्नांपेक्षा नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांनीच राज्यातल्या निवडणुका गाजत आहे. आणि त्याला ठाणे महापालिकेची निवडणुकही अपवाद नाही.
ठाणे सर करण्यासाठी महायुती आणि आघाडीनं सर्व अस्त्रे बाहेर काढली आहेत. एकमेकांचे मोहरे फोडण्याबरोबरच अफवांचं पिकही इथं जोमात आलं आहे. शिवसेनेनंच चड्डी बनियन गॅगची अफवा पसरवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.तर राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईकांनी ठाण्यातली आघाडी तोडण्यासाठी शिवसेनेनं ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केल्यानं खळबळ माजली आहे.
संजीव नाईकांचे आरोप बिनबुडाचे असून ठाण्यात विजय निश्चित असल्यानं आम्हाला अफवा पसरवण्याची गरज नसल्याचं सांगत शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी विरोधकांच्या आरोपांचं खंडण केलं आहे. मुंबईबरोबरच ठाणे महापालिकाही ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मतदारांना आपल्या तंबूत आणण्यासाठी राजकीय पक्ष विविध खेळ्या करताना दिसत असला तरी हुकुमाचा पत्ता मात्र मतदारांच्या हातातच आहे.