www.24taas.com, मुंबई
मला महाराष्ट्राचा अभिमान आहे, गुजरातचा नाही असं सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या गुजरात प्रेमाचा समाचार घेतला. हे कमी की काय मी वडिलांसारखा बोललो पण वडिलांची नक्कल केली नाही असं सांगत राज ठाकरेंवर पुन्हा एकदा निशा णा साधला. शिवसेना प्रमुखांनी कार्यकर्त्यांना तुमची परीक्षा झाली आहे का असं विचारत मनसेच्या परीक्षा पद्धतीची खिल्लीही उडवली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेनेच्या विभागप्रमुख, गटप्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेची बैठक वांद्रयाच्या हॉटेल रंगशारदा इथे आयोजित करण्यात आली. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाषण केलं.
अण्णा हजारे चांगला माणूस आहे. पण सध्या अण्णांसाठी परिस्थिती चांगली नाही. 'मै अण्णा हजारे' अशी टोप्या घातल्या मग काँग्रेस-राष्ट्रवादीला यश कसं मिळालं ? असा प्रतिप्रश्नही सेना प्रमुखांनी केला.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम सुरु आहे. महापालिकेवर भगवा फडकला पाहिजे. महापालिका हातची जाऊन देणार नाही, असा निर्धाराही शिवसेनाप्रमुखांनी यावेळी व्यक्त केला.