अतुल कुमार ठरला 'घाटांचा राजा'

सायकलिंग क्षेत्रात सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबई-पुणे सायकल रेस पार पडली. 153 किलोमीटरच्या या सायकल रेसमध्ये 120 सायकलपटूंनी सहभाग नोंदवला होता.इंडियन आर्मीच्या अतुल कुमारने 3 तास 52 मिनिटांची वेळ नोंदवत मुंबई-पुणे सायकल रेसच्या जेतेपदावर नाव कोरलं.

Updated: Apr 22, 2012, 04:55 PM IST

www.24taa.s.com, मुंबई

 

सायकलिंग क्षेत्रात सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबई-पुणे सायकल रेस पार पडली. 153 किलोमीटरच्या या सायकल रेसमध्ये 120 सायकलपटूंनी सहभाग नोंदवला होता. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी रेसला झेंडा दाखवला. इंडियन आर्मीच्या अतुल कुमारने 3 तास 52 मिनिटांची वेळ नोंदवत मुंबई-पुणे सायकल रेसच्या जेतेपदावर नाव कोरलं.

 

सायकल रेस म्हटलं की सर्वांना आठवते टूर दी फ्रान्स रेस. भारतातही सायकल रेसिंग स्पर्धांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते. अशीच प्रतिष्ठेची असणारी मुंबई-पुणे सायकल रेसची सुवर्णमहोत्सवी स्पर्धा नुकतीच पार पडली. 153 किलोमीटरच्या या सायकल रेसमध्ये इंडियन आर्मीच्या अतुल कुमारने 3 तास 52 मिनिटे 59 सेंकंदांची वेळ नोंदवत स्पर्धेचं जेतेपद मिळवलं.तर मानाचा 'घाटाच्या राजा'चा किताबही त्यानेच मिळवला. एअर फोर्सचा अमित कुमार दुसरा, तर मुंबईच्या ओंकार जाधवने तिसरा क्रमांक पटाकवला.

 

गेट वे ऑफ इंडिया येथून सुरू झालेल्या या सायकल  रेसमध्ये 120 सायकलपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी रेसला झेंडा दाखवत सुरूवात केली. या सायकल रेसचा आर के स्टूडिओपर्यंतचा पहिला 20 किलोमीटरचा टप्पा स्पर्धाविरहीत होता. त्यानंतर चेंबूर येथून सुरू झालेल्या या सायकल रेसमध्ये प्रत्येक सायकलपटू आघाडी घेण्याकरता वेगाने सायकल पळवत होता. ठाणे खाडी ब्रिज, नवी मुंबई, पनवेल, खंडाळा, लोणावळा, खडकी मार्गे पुण्यातल्या संभाजी उद्यान येथे या सायकल स्पर्धेची सांगता झाली. या मुंबई-पुणे सायकल रेसमध्ये विजेत्यांना एकुण सात लाखांच्या बक्षिसांचं वितरण करण्यात आलं.