चला मुंबईकरांनो तयार व्हा, 'पाण्यावर तरंगण्यासाठी'

‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मेरीटाइम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस’ यांच्या सहकार्यातून मुंबई येथून राहुरीचे मुळा धरण, तसेच नाशिक, पुणे येथे समुद्री विमानसेवा सुरू करण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.

Updated: Jul 12, 2012, 12:53 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

समुद्री विमानसेवा लवकरच याचा देखील अनुभव हा मुंबईकरांना, पुणेकरांना आणि नाशिककरांना घेता येणार आहे. ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मेरीटाइम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस’ यांच्या सहकार्यातून मुंबई येथून राहुरीचे मुळा धरण, तसेच नाशिक, पुणे येथे समुद्री विमानसेवा सुरू करण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी कंपनीच्या अधिकार्‍यांनी नुकतीच राहुरीच्या मुळा धरण परिसराला भेट देऊन पाहणी केली. ‘सी प्लेन’ अर्थात पाण्यावर तरंगणारी विमानसेवा सध्या १४ फेब्रुवारी २०११ पासून अंदमान-निकोबार बेटांवर सुरू करण्यात आली आहे.

 

याबाबत तांत्रिक सर्वेक्षण करण्यासाठी येत्या दोन महिन्यांत तज्ज्ञांची एक समिती मुळा धरणास भेट देणार आहे. या कंपनीमार्फत गिरगाव चौपाटी, पवना डॅम, अपर वैतरणा, नाशिक, लोणावळा, मुळशी डॅम, पुणे, हरिहरेश्‍वर, गणपतीपुळे व तारकर्ली येथेही अशी सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. यासाठी पर्यटन महामंडळाच्या विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयांची जागा व हॉटेल्सचे सहकार्य घेऊन कंपनीच्या सेवा पुरविण्यासाठी उपलब्ध करून देणार असून, यासंबंधीचा करारही करण्यात आलेला आहे.

 

पाटबंधारे विभागाने ही सेवा सुरू करण्यासाठीचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र वरिष्ठांकडे सादर केले असून, शिर्डी विमानतळ सुरू होण्यापूर्वीच मुळा धरणातील विमानसेवा सुरू होणार असल्याने राहुरी ते मुंबई प्रवास अवघा दीड तासात पूर्ण होणार आहे. या सेवेचा साई व शनिभक्तांना मोठा लाभ होणार असून, राहुरी तालुका जगाच्या नकाशावर झळकणार आहे.