www.24taas.com, मुंबई
ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी शेवटपर्यंत सामान्यांसाठी लढा दिला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी सामान्यांसाठी आपले आयुष्य वेचले. पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे 'पाणीवाली बाई' आणि महागाईच्या विरोधात केलेल्या प्रखर आंदोलनामुळे 'लाटणेवाली बाई' म्हणून त्या देशभरात प्रसिद्ध होत्या.
सुरुवातीला मुंबईतील गोरेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून; तसेच नंतर मुंबई महापालिका, महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा अशा विविध स्तरांवर त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मृणाल गोरे यांनी १९७२ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. कॉंग्रेसचे उमेदवार ऍड्. माधवराव परांजपे यांच्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोरेगावात प्रचारसभा घेतली होती; पण जनसामान्यांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्या विजयी झाल्या. आणीबाणीत १९७५ ते १९७७नसभेवर पुन्हा निवड झाली आणि १९८८ च्या अखेरीला विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी सभागृह गाजवले.
मृणालताईंनी प. बा. सामंत आणि कमल देसाई यांच्यासह माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने अंतुले यांच्याविरोधात निर्णय दिल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 'उभी मुंबई आडवी करू' ही त्यांची घोषणा गाजली होती. नागरी निवारा परिषदेसाठी त्यांनी 14 वर्षे आंदोलन करून राज्य सरकारकडून गोरेगाव पूर्व येथे दिंडोशी परिसरात ६५ एकर जागा मिळवली. नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सुमारे ६ हजार जणांना घरे मिळवून दिली.
आयुष्य गोरेगावात
मृणाल गोरे यांचे संपूर्ण आयुष्य गोरेगावात गेले. 'टोपीवाला बंगला' म्हणजे मृणाल गोरे असे समीकरण झाले होते. हे ठिकाण १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात स्वातंत्र्यसैनिकांचे आश्रयस्थान होते. हा बंगला 'मूषक महाल' या नावाने ओळखला जात होता. मृणालताईंनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षांत शिकत असताना स्वातंत्रलढ्यात उडी घेतली. त्यामुळे त्यांचे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावरच थांबले; अन्यथा त्या डॉक्टर झाल्या असत्या. गोरेगावात त्यांनी स्थापन केलेल्या केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या असलेल्या मृणालताई यांच्यावर एस. एम. जोशी आणि डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा मोठा पगडा होता.
लढा झोपडीवासीयांसाठी
झोपडीवासीयांचे प्रश्न हाती घेण्यास कोणताही राजकीय पक्ष तयार नव्हता. त्या काळात त्यांनी झोपडीवासीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुंबईवरील वाढता ताण कमी करण्यासाठी सरकारी यंत्रणा नवी मुंबईत हलवाव्यात, या मागणीसाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. त्यांची मागणी किती सार्थ होती, याचा अनुभव आता राज्यकर्त्यांना येत आहे. हे मृणालताईंच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे.
मृणाल गोरे यांनी झोपडीवासीयांच्या प्रश्नांवर मोर्चे काढले, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या.फेरीवाल्यांविरोधातील महापालिकेची कारवाई रोखून फेरीवाल्यांना पर्यायी जागा द्यावी, या मागणीसाठी त्यांनी लढा उभारला होता. रेल्वेप्रवाशांचे प्रश्न त्यांनी सरकारसमोर मांडले होते. महिलांच्या प्रश्नांवर त्या नेहमीच आग्रही राहिल्या. म्हणून त्यांना 'रणरागिणी', असे संबोधले जात होते.