मुंबईत सध्या जागांचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न वादात आहेत. विक्रोळीतल्या कन्नमवारनगरमधल्या भिमछायामधील रहिवाश्यांच्या डोक्यावरील छप्पर शासनानं काढून टाकलंय. त्यामुळे इथल्या रहिवाशांना उघड्यावर आपले संसार थाटावे लागत आहेत.
गेल्या २१ वर्षांपासून कन्नमवार नगरातील भिमछाया झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांच्य़ा डोक्यावरील छप्पर तोडल्यानं अनेकांनी आपले संसार उघड्यावर मांडलेत. ही जागा ‘कलेक्टर लॅन्ड’ आहे. शिवाय १९९०पासून इथं राहूनही आमची घरं अवैध कशी असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. त्यातच या नागरिकांना हटवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ५ ते ६ फूट खोल खड्ड्यांमध्ये पडून जयेश मोहीते या चिमुकल्याला प्राण गमवावे लागलेत. तर दुसरीकडे घर गमावल्यानं अंकुश पाटील या ३० वर्षीय युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
शासनाच्या या अशा कारवाईमुळे आणि इथल्या दुःखद घटनांमुळं स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसंच इथे आमच्या मदतीला कुणीच येत नसल्याचं या रहिवाशांचे म्हणणं आहे.