www.24taas.com, मुंबई
एनडीएनं पेट्रोल दरवाढीच्या हाकेला मुंबईकरांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय. मुंबईत अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मध्य मुंबईतून ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतलंय. मध्य विभागात पोलिसांनी ही कारवाई केलीयं. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
भाजप नेत्यांना अटक
मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी अटक केली. पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरलेल्या मुनगंटीवर, राज पुरोहित, किरीट सोमय्या, सरदार तारासिंग यांनी रास्ता रोकोही केला. पोलिसांनी या सर्व नेत्यांना अटक केली.
मुंबईत ४३ बसेसची तोडफोड
मुंबईत बेस्टच्या ४३ बसेस फोडल्यानं काही काळ बसेसच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबईत लालबाग, वरळी, काळाचौकी, मुलुंड आदी ठिकाणी बेस्टवर दगडफेक आणि तोडफोड झाली. बाजारपेठांनीही कडकडीत बंद पाळलाय.
बेस्ट / रेल्वे वाहतूक सुरू
मुंबईत भाजपनं पुकारलेल्या बंदाला चांगला प्रतिसाद मिळतोय. मुंबईतले रस्ते सामसूम आहेत. रस्त्यांवर तुरळक वाहतूक सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तोडफोडीच्या भीतीने अनेक टॅक्सी आणि खासगी वाहन रस्यांवर गायब झाली आहेत. बंदचा जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय. कारण रिक्षा आणि अन्य वाहतूकही बंद आहे. अनेक कार्यालयांतही तुरळक उपस्थिती आहे. पण, ४३ बसेसची तोडफोड होऊनही बेस्टच्या बसेस नियमीत सुरु ठेवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय. त्यामुळे बेस्ट बसेस नागरिकांच्या उपयोगी पडू शकतात. रेल्वे वाहतूकीवरही फारसा परिणाम जाणवला नाही.
दादरमध्ये गाड्यांवर चढून आंदोलन
दादर भागात भाजप कार्यकर्त्यांनी गाड्यांवर चढून आंदोलन केलं. आगळं वेगळं आंदोलन करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या परिसरात बससेवा सुरळीत सुरू आहे. टॅक्सी सेवा बंद करण्यात आल्यानं लोकांनी बसमधून जाणं पसंत केलंय.
मुलुंडमध्ये बैलगाडी मोर्चा
पेट्रोल दरवाढीचा निषेध लोक आपआपल्या पद्धतीनं करतायत. मुंबईत मुलुंड भागात व्यापा-यांनी दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पाळलाय. बैलगाडी मोर्चा काढून त्यांनी पेट्रोल दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला. तर सकाळी ९च्या सुमारास मुलुंडमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली. एलबीएस रोडवर ५१४ नंबरच्या बसवर ५ ते ७ जणांनी दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही
मुंबईत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. काही मुंबईकरांनी घरीच बसणं पसंत केलंय. तर काहींनी नेहमीप्रमाणे कामावर जाण्याची धडपड सुरू केलीये. वर्दळीचं स्टेशन म्हणून ओळखलं जाणाऱ्या खेरवाडी स्टेशनवर आजही अशीच धडपड पाहायला मिळत आहे.
कांदिवलीत व्यापा-यांनी नोंदवला निषेध
मुंबईत कांदिवलीमध्ये व्यापा-यांनी दुकाने बंद ठेऊन त्यांचा सहभाग नोंदवला. पेट्रोल दरवाढीच्या विरोधातला संताप त्यांनी दुकाने बंद ठेऊन व्यक्त केलाय
ठाण्यात 'बंद'साठी जबरदस्ती
ठाण्यात बंद करण्यासाठी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी रिक्षालकांना जबरदस्ती केली. मारहाण करुन त्यांना बंद करण्सासाठी भाग पाडलं.