www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीत समाधान सरवणकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अटीतटीच्या लढतीत प्रवीण छेडांनी विजय मिळवला. निवडणुकीच्या तोंडावर प्रवीण छेडा यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या भालचंद्र शिरसाट आणि काँग्रेसच्या तिकिटावर लढत देत असलेल्या प्रवीण छेडांमध्ये अखेरपर्यंत निकाराचा सामना रंगला.
गुरुदास कामत यांचे नातलग असलेल्या तीन वेळा नगरसेवक असलेल्या समीर देसाई यांनाही धक्कादायक पराभव पत्कारावा लागला आहे. तर काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांचा मुलगा समीर चव्हाण यालाही पराभवाची धुळ चाखावी लागली आहे. शिवसेनेच्या राजूल पटेल याही काँग्रेसच्या ज्योत्सना दिघे यांच्याकडून पराभूत झाल्या. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात माजी महापौर मिलिंद वैद्यही पराभूत झाले. मनसेच्या प्रकाश दरेकर यांनी शिवसेनेच्या संजय घाडींना अटीतटीच्या लढतीत आस्मान दाखवलं. अखिल भारतीय सेनेच्या वंदना गवळी आणि गीता गवळी यांनी सलग दोन वेळा विजयश्री प्राप्त केली आहे.