www.24taas.com, मुंबई
मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसच्याच आमदारांमध्ये असलेली नाराजी चर्चेनं दूर करता येईल, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री पतंगराव कदमांनी केलं.
आमदारांशी बोलून आणि मुख्यमंत्र्यांशी भेटून नाराजी दूर करता येईल, असं सांगत पतंगरावांनी आमदार नाराज असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली.
विदर्भातल्या काही आमदारांनी सुरु केलेल्या मुख्यमंत्री हटाव मोहिमेवर काँग्रेसमधून पहिलीच प्रतिक्रिया आलीय.... विदर्भातील 10 ते 12 आमदारांनी बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांविरोधात मोहीम सुरु केल्याची बातमी होती.
गेल्या दोन दिवसांपूर्वी कामं होत नसल्यानं संतप्त झालेल्या आमदारांनी गुप्त बैठक घेऊन मुख्यमंत्री हटाव मोहीम सक्रीय करण्याचं ठरवलं होतं. विदर्भातील काँग्रेसच्या १०-१२ आमदारांनी मुख्यमंत्री हटाव सुरु केलीय.
पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना हटवा अशी मागणी श्रेष्ठींकडे करण्याचं या आमदारांनी ठरवलं होतं.
महापालिका आणि झेडपी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फारसं यश मिळालं नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र दिवसेंदिवस काँग्रेसवर कुरघोडी करून डिवचते आहे. अशावेळी नेतृत्वाबद्दल आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हटाव मोहीमेनं पुन्हा उचल घेतली होती. त्याला आता पतंगरावांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांवर मुंबईतले काँग्रेस आमदारही नाराज असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतात, पण काँग्रेसच्या आमदारांनाच भेटायला, त्यांना वेळ नाही, असा आरोप काँग्रेसच्यात मुंबईतल्या आमदारांनी केला आहे.