रंगबाधित रुग्णांच्या भेटीला मुख्यमंत्री

मुंबईत रंगांची बाधा झालेल्या रुग्णांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी राज्य सरकारकडून पाच जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

Updated: Mar 9, 2012, 11:52 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत रंगांची बाधा झालेल्या रुग्णांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी राज्य सरकारकडून पाच जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती दोन आठवड्यात आपला चौकशी अहवाल देईल, अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. दरम्यान यामध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बंद पडलेले रासायनिक कारखाने आणि विषारी रंग याबाबत सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासन सुद्ध या प्रकरणी चौकशी करणार आहे.

 

धारावीच्या नवरंग कंपाऊंडमधल्या बंद कारखान्यातून मुलांनी हा रंग आणला होता. औद्यागीक वापर असलेल्या या रंगाची बाधा झालेल्यांमध्ये दहा ते बारा वर्षांच्या मुलांची संख्या जास्त आहे. सर्व रुग्णांना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. संबंधित कारखान्यातला रंग लावलेल्या मुलांनी चेहरा आणि डोळे धुतल्यानंतर त्यांना त्रास सुरु झाला. उलट्या आणि चक्कर येऊ लागली. डोळ्यांमध्ये आणि चेहऱ्यावर जळजळ व्हायला लागली. त्यानंतर माहीम, शास्त्रीनगर, धारावी या भागातल्या लोकांना रंगाची ऍलर्जी झाली आहे. हा रंग माहीम पाईपलाईन या भागातून विकत घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा विषारी रंग ताब्यात घेतला. नवरंग कंपाऊंडमधल्या बंद कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तिथले रंग जप्त केलेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. कारखान्य़ाच्या मालकाचा शोध सुरू केला आहे.

 

घटना घडल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. चौकशीचं सत्र सुरु झाले. पोलिसांबरोबरच अन्न आणि औषध प्रशासनही याप्रकरणी चौकशी करणार असल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. रंगांची बाधा झालेल्यांमध्ये काही मुले-मुली दहावी आणि बारावीचे परीक्षार्थी आहेत. यापुढे बंद पडलेल्या रासायनिक कारखान्यांबाबत स्थानिक प्रशासनाने जागृत राहून कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.