www.24taas.com,मुंबई
ठाण्याच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही, असं सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी मनसेचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिलेत. स्थानिक पातळीवर हे प्रश्न सुटायला हवेत हे सांगतानाच मनसे याप्रकरणी राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
ठाण्यात महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत राज ठाकरे किंग मेकर बनले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवल्यानंतर आता शिवसेनेचे आमदार राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यापासून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी रात्रीचा दिवस केला. परंतु राजकृपेनं ठाण्यावर भगवाच फडकला. आता राजकृपेनेच स्थायी समिती राष्ट्रवादीला मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. सेनेचा महापौर केल्यानंतर स्थायी समितीचं सभापतीपद मनसेला हवं होतं. परंतु महायुतीनं कुठलाच प्रतिसाद न दिल्यानं मनसेनं ही नवी खेळी खेळल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरेंनी मात्र राष्ट्रवादीला देत असलेल्या पाठिंब्याचं कारण हे सांगितलं.
मनसेनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानं स्थायी समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणाराय. १६ सदस्यांच्या स्थायी समितीत शिवसेनेचे सात आणि भाजपचा एक सदस्य असे ८ सदस्य महायुतीकडं तर आघाडीकडं राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेसचे दोन आणि मनसेचा एक असे ८ सदस्य असणारेत. तसंच आघाडी आणि महायुती अशा दोघांचेही संख्याबळ ६५ होणार असल्यानं घोडेबाजाराला चालना मिळणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवल्यानंतर आता ठाण्यातले शिवसेनेचे तीन आमदारही राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न करतायत. मुंबईत किंगमेकर होऊ न शकणारे राज ठाकरे ठाण्यात मात्र किंगमेकरची भूमिका पार पाडत असून आघाडी असो वा महायुती दोघांनाही राज ठाकरेंच्या दारी जाणं भाग पडतंय एवढं नक्की.