लालकृष्ण अडवाणींचा भाजपवरच निशाणा

भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. लालकृष्ण आडवाणी यांनी थेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनाच टार्गेट केले आहे. गडकरी यांच्यावर टीका करताना अडवाणी म्हणाले, भाजपवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.

Updated: May 31, 2012, 03:23 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. लालकृष्ण आडवाणीं यांनी थेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनाच टार्गेट केले आहे. गडकरी यांच्यावर टीका करताना अडवाणी म्हणाले, भाजपवर लोकांचा विश्वास  राहिलेला नाही.

 

बहुजन समाजवादी पक्षातून हकालपट्टी झालेले बाबू सिंह कुशवाह यांना भाजपमध्ये सहभागी करून घेतल्याबाबत तसेच बी. एस. येडियुरप्पा आणि झारखंडचे अंशुमन मिश्रा यांच्या मुद्यावरून पक्षाच्या भूमिकेची त्यांनी निंदा केली. आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून  ही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत दुफळी प्रथमच यानिमित्ताने दिसून आली आहे.

 

जनता युपीए सरकारवर नाराज आहे. मात्र, आपल्या पक्षावर खूशही नाही. पक्षात सध्या निरुत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीतील अपयशानंतर बसपने हकालपट्टी केलेल्या कुशवाह यांना पक्षात घेतल्याने, तसेच कर्नाटक आणि झारखंडमधील नेत्यांबाबत पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे, असे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मुलाच्या विवाहसमारंभाला गडकरी आणि अरुण जेटली गेले होते. तेव्हापासूनच आडवाणी नाराज असल्याचे बोलले जात आहे. युपीए सरकारवर जनता नाराज असली, तरी आपल्यावर खूशही नाही, असे मत आपण मुंबईत झालेल्या अधिवेशनादरम्यानही व्यक्त केल्याचे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.