www.24taas.com, मुंबई
गुढीपाडवा म्हणजे शोभायात्रा असं समीकरण बनलेल्या मुंबईतील तरूणाई गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यामुळे उद्या मुंबईत जल्लोष असणार आहे.. तर मुंबईत कुठे - कुठे शोभायात्रा आणि पाडव्यानिमित्त कार्यक्रम असणार हे आपल्यासाठी www.24taas.com वर उपलब्ध.
गिरगाव शोभायात्रेवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
गिरगाव आणि नववर्ष शोभायात्रा याचं नातं काही औरच आहे.. मुंबईतील मराठी भाषिक असा समजला जाणारा हा परिसर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपलं मराठीपण दाखवून देत असतो.. येथील शोभायात्रा ही संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. त्यामुळे या शोभायात्रेसाठी यंदा एक खास गोष्ट करण्यात येणार आहे. शोभायात्रेवर स्वयंचलित हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या शोभायात्रेतील प्रभू रामचंद्रांची २० फूट उंच मूर्ती हे प्रमुख आकर्षण आहे. आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या वतीने स्वयंचलित हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येईल. यात्रेचा समारोप दुपारी १२ वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर, धोबीतलाव येथे होईल.
लालबाग मधील शोभायात्रा
लालबाग मार्केट येथील हनुमान मंदिराकडून सकाळी ७.३० वाजता ही शोभायात्रा निघणार आहे. लालबाग मार्केट, काळाचौकी नाका, व्होल्टास कंपनी येथून वळून हिंदमाता लेन, तेजुकाया मँन्शन या मार्गाने यात्रा जाईल. भारतमाता सिनेमा येथे यात्रेचा समारोप होईल. यात्रेत १२ चित्ररथ, लेझीम व ढोलताशा पथके यासह शेकडो नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत.
ताडदेवमधील भव्य शोभायात्रा
ताडदेवमध्ये सलग तिसर्या वर्षी गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही या शोभायात्रेत विविध सण उत्सवांचे चित्ररथ, पारंपरिक देखावे, नमन, वारकरी दिंडी, महिलांचे लेझीम पथक, मंगळागौर हे पाहता येणार आहे. या शोभायात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ताडदेव चौकात भव्य ८० फुटी गुढी उभारण्यात येणार आहे. पारंपरिक वेशात सहभागी असलेले नागरिक, शालेय विद्यार्थी महिला व सिने-नाट्यसृष्टीतील सितारे या वैभवयात्रेत सहभागी होतील.
वरळीत शोभायात्रा
वरळी परिसरात नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आहे. शुक्रवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत शोभायात्रा काढण्यात येणार असून अनेक लेझीम पथके, पुणेरी झोल-ताशा, साई चित्ररथ पालखी, सामजिक संदेश चित्ररथ त्यात सहभागी होणार आहेत.