www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अरविंद केजरावाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे महाराष्ट्रामध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आपच्या घोडदौ़डीची तयारी सुरु केली आहे. यासाठी ठिकठिकाणी आपची कार्यालयं उघडत आहेत. यांचा प्रयत्न एकच, दिल्लीप्रमाणं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविणं.
सध्या देशाच्या राजकारणात आम आदमी पार्टीनं खळबळ उडवलीये. ज्या पद्धतीनं आपनं दिल्ली मध्ये सत्तेचं केंद्र ताब्यात घेतलं. त्यावरुन ही खळबळ निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यामुळं आता दिल्लीबाहेर ‘आप’ प्रभावी ठरेल का? याची चर्चा जोरात सुरु आहे. म्हणूनच आता महाराष्ट्रातले आपचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं जोरदार तयारीला लागलेत. कुठं त्यांचे पक्ष प्रवेशाचे सोहळे होतायत तर अनेक ठिकाणी आपची कार्यालये सुरु होत आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते आपचा महाराष्ट्र प्रवास तसा सोपा नाही. कारण दिल्ली आणि महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शिवाय महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे चेहरा नाही. अण्णा हजारेंचा पाठिंबा नाही. महाराष्ट्रातलं जातीचं राजकारण या बाबी देखील आपसाठी महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या ठरणार आहेत. पण दिल्लीमध्ये मिळालेल्या यशाचा फायदा त्यांना महाराष्ट्रामध्ये होईल. त्यामुळं आप आश्चर्याचा धक्का देऊ शकते, असं मत राजकीय पंडितांनी मांडलंय.
अवघ्या एक ते दीड वर्षात आपनं मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे यात शंका नाही. स्वाभाविक आहे आप आता इतर राज्यांमध्येही मुसंडी मारण्याच्या जोरदार तयारीत आहे. त्यामुळंच आप त्या त्या राज्यामधील प्रस्तावित व्यवस्थेला कशा पद्धतीनं धक्का पोहोचवेल हे पाहावं लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.