मुंबई : केईएम हॉस्पिटलमध्ये ४२ वर्षापासून कोमात असलेल्या अरूणा शानबाग यांचं आज निधन झालं, अरूणा शानबाग यांची ही अवस्था कुणी केली, त्यांची आयुष्याची ४२ वर्ष कोमात असली तरी ती कशी गेली, या काळात नातेवाईक कसे दूर गेले आणि हॉस्पिटलच्या परिचारिका शेवटपर्यंत शानबाग यांचं परिवार म्हणून कशा सोबत होत्या, त्याची ही कहाणी.
थोडक्यात अरूणा शानबाग?
अरूणा शानबाग या कर्नाटकच्या शिमोगामधील हल्दीपूर गावाच्या होत्या, त्यांनी १९६६ मध्ये मुंबईच्या केईएम रूग्णालयात नर्सचं काम सुरू केलं.
अरूणा शानबाग यांचा गळा साखळीने दाबला
हॉस्पिटलमधील एक सफाई कर्मचारी सोहनलाल हा कुत्र्यांसाठी असणारं मास चोरतो हे शानबाग यांनी पाहिलं, त्याबद्दल त्यांनी त्याला हटकलं, सोहन लाल याला त्याचा राग होता. यावरून
२७ नोव्हेंबर १९७३ रोजी अरूणा शानबाग यांच्यावर सोहन लाल वाल्मिकी नावाच्या कर्मचाऱ्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यात त्याने अरूणाचा गळा कुत्र्याला बांधण्याची साखळीने दाबला, यात तिच्या मेंदूला ऑक्सिजन जाणं बंद झाल्याने, तिच्या मेंदूला इजा झाली आणि ती कोमात गेली.
आरोपी सात वर्षात सुटला
दुसऱ्या दिवशी एका सफाई कमर्चाऱ्याला ती रक्ताच्या थारोळ्यात दिसून आली, त्यावेळी हॉस्पिटल्सच्या नर्सेसने तीन दिवसांचं आंदोलन करून सुरक्षेची मागणी केली.१९७४ साली सोहनलाल ला हत्येच्या प्रयत्नात आणि कानातील सोनं चोरण्याच्या आरोपाखाली सात वर्षाची शिक्षा झाली, मात्र बलात्काराचा प्रयत्न, अथवा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला नाही.
४२ वर्ष जगली, पण कोमात
यानंतर अरूणा ४२ वर्ष जगली पण कोमात. अरूणा अंथरूणात असली तरी तिला बोलता येत नव्हतं, ती डोळे उघडत होती, तिच्या डोळ्यात वाचून तिला काय हवंय, ते सेवा करणाऱ्या नर्स ओळखत होत्या.
पुरूषांच्या आवाजानं दचकायच्या अरूणा शानबाग
अरूणा अनेक वेळा सारखी रडत असायची, रडू नकोस म्हणून, परिचारिकांकडून समजूतही काढली जात होती. तिच्यावर झालेल्या पाशवी बलात्काराचा तिच्या मनावर खोलपर्यंत परिणाम झाला असावा, कारण पुरूषाचा मोठा आवाज ऐकून ती दचकायची. ती रडायची तेव्हा तिला काय हवंय, नकोय, याचा अंदाज घेतला जायचा.
अरूणांना ऐकवली जात होती सत्तरीतल्या दशकाची गाणी
सत्तरीच्या दशकातील गाण्यांची आवड असलेल्या अरुणा शानबाग यांच्यासाठी अजूनही केईएमच्या त्यांच्या खोलीत गाणी लावली जात होती. एवढेच नव्हे, तर त्यांच्या उपचारांसाठी येत असलेल्या नर्सच्या दोन पिढ्याबदलल्या असल्या तरी त्यांच्या आवडीचे मासे आणि गोड पदार्थ करून आणण्याच्या परंपरेत खंड पडलेला नव्हता.
शानबाग यांची सेवा हा एक गौरवशाली इतिहास
शानबागबद्दल केईएमच्या परिचारिकांनी जी आत्मीयता दाखवली आणि सेवा केली, तो आता एक गौरवशाली इतिहास झाला आहे.
शानबाग यांच्या भावना डोळ्यात दिसायच्या
शानबाग यांचा दिवस सकाळी सात वाजता सुरू व्हायचा, त्यांचं अंग स्पंजने अंग पुसलं जायचं, तसेच कपडे बदलून दिल्यावर साडेनऊच्या सुमारास नाश्ता दिला जात होता. शानबाग यांची अन्न चावण्याची प्रक्रिया धीमी असल्याने नळीवाटे जेवण दिले जात होते.
एकच आहाराने कंटाळायच्या अरूणा शानबाग
दूध, प्रोटीनयुक्त आहार, रवा कांजी, वरण-भात त्यांच्या आहारात असे, मात्र रोजचे हे जेवण करण्याचा त्यांनाही कधीतरी कंटाळा येत असे. शानबाग यांना गोड पदार्थ तसेच मासे आवडायचे. हे सर्व बोल त्यांच्या डोळ्यांच्या भावना दिसयाचे. शानबाग यांना दिवाळीतही त्यांना पेढा-बर्फी देण्यात आली होती.
दया मरण
अरूणा शानबाग यांना नंतर कुणीही नातेवाईक भेटायला आले नाहीत, अरूणा यांची कहाणी दुर्देवी होती, अरूणा यांना इच्छा दया देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या दया मरणाची परवानगी दिली नाही, तेव्हा केईएमच्या नर्सेसने जल्लोष केला होता, अरूणा आमच्यासाठी एक लहान मुली सारखी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
सुदैवं-दुर्देवं
अरूणाच्या आयुष्यात जे झालं ते एक मोठं दुर्देवं होतं, मात्र अरूणाची केईएमच्या अनेक परिचारिकांनी सेवा केली. या काळात नातेवाईकही तिला विसरले नाहीत, पण निवृत्त झालेल्या परिचारिका तिला भेटायला येत होत्या. तिच्या डोळ्यातील भावना ओळखून तिला काय हवंय, याचा अंदाज घेत होत्या. कदाचित हेचं अरूणा शानबागचं सुदैव होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.