मुंबई : रस्त्याच्या उलट्या बाजूनं गाड्या चालणा-यांना वाहतूक पोलिसांनी चाप लावलाय. अशा चालकांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. आधी दंडावर सुटका होत होती. आता मात्र तुरुंगाची हवा खायला लागतेय. एक स्पेशल रिपोर्ट.
ट्राफिक असेल किंवा जवळ यू टर्न नसेल तर राँग साईडनं गाडी रेटायची, हे प्रकार आपल्या शहरांमध्ये नित्याचेच. मात्र यामुळे सरळमार्गी चालकांना अनेकदा उपद्रव होतो आणि वाहतुकीला अडथळा होतो. आतापर्यंत पोलिस केवळ समज देऊन अशा राँग साईडर्सना पिटाळायचे किंवा फार फार तर दंड व्हायचा. आता मात्र कायद्याचा आधार घेऊन अशा चालकांना थेट अटक होतेय आणि त्यांची वाहनंही जप्त केली जातायत. आता ही मोहीम अधिक कडक करण्यात आलीये.
मद्यपी चालकांविरुद्ध मुंबई वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केलीये. यंदाच्या वर्षांत दोन हजार ७२४ मद्यपींना तुरुंगाची हवा खावी लागलीये. त्याच धर्तीवर आता राँग साईडनं गाडी पळवणा-यांवर कारवाई करण्यात येतेय. २ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहीमेत एक हजारहून अधिक चालकांवर अटक आणि जप्तीची कारवाई झालीये. यातल्या २१६ जणांना गजाआड जावं लागलंय.
ट्रॅफिकचे नियम मोडण्याचे प्रकार आपल्याकडे सर्रास घडत असतात. ड्रँक अँड ड्राईव्ह, राँग साईड, सिग्नल जंपिंग, ट्रिपल सीट प्रवास असे उद्योग करणारे चालक कमी नाहीत. या प्रकारांना आळा घालण्यात या मोहिमेमुळे यश येऊन सर्वांचाच प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.