मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या दर्शन घेतल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, प्रवाशांच्या समस्या सोडवण्याबाबत अॅक्शन प्लॅन ठरवणार आहेत, असे आश्वासन मुंबईत आलेल्या रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिले.
मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आता थेट प्रभूच धावून आलेत. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल मुंबईत येऊन शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आणि बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. तसंच त्यांनी मातोश्रीवरही हजेरी लावली. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची बैठकही घेतली.
रेल्वे प्रवाशांना भेडसावणा-या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येईल, असं आश्वासन प्रभूंनी दिलंय. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक, डोंबिवलीत महिलांनी केलेले आंदोलन, रेल्वे अपघातातील बळींची वाढती संख्या, कोकण रेल्वेचा वारंवार होणारा खोळंबा अशा विविध रेल्वे समस्यांनी सध्या मुंबईकर आणि कोकणी प्रवाशांना ग्रासलंय.. त्यातून आता सुरेश प्रभूच काहीतरी मार्ग काढतील, अशी अपेक्षा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.