www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
विक्रोळीमधल्या हरियाली भागातले रहिवासी तापाच्या साथीनं आणि डासांच्या त्रासानं हैराण झालेत. महानगरपालिकेकडे विनंती करुनही धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात नसल्याची इथल्या नागरीकांची तक्रार आहे.
विक्रोळी आणि कांजुरमार्गमध्ये रेल्वे मार्गाला समांतर सुमारे ५० हजारांची हरियाली नावाची लोकवस्ती आहे. बैठी घरं आणि झोपडपट्टी असलेल्या या परिसराला आरोग्य सेवेच्या बाबतीत पालिकेनं वाऱ्यावर सोडल्याची इथल्या नागरिकांची तक्रार आहे. अनेक नागरिकांना मलेरिया आणि डेंग्यूची लागण झालीय. पावसाळा सुरु झाल्यापासून प्रत्येक घरांत किमान एक रुग्ण तापानं आजारी आहे. डासांचा त्रास दूर करण्यासाठी पालिका कुठल्याही उपाययोजना करत नसल्याचा इथल्या नागरिकांचा आरोप आहे.
पालिका काहीच करत नसल्यानं स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी आता पुढाकार घेतलाय. पालिकेकडून स्वतःच डॉक्टर आणत नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केलीय. आता अर्धा पावसाळा संपलाय. निदान आता तरी पालिकेनं या परिसरातल्या स्वच्छतेकडे आणि आरोग्य सुविधेकडे लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.