धक्कादायक: माजी पोलीस आयुक्तांच्या घरात सेक्स रॅकेट

मुंबई पोलिसांनी एक सेक्स रॅकेट उधळून लावलंय. पण धक्कादायक बाब म्हणजे हे सेक्स रॅकेट ज्या फ्लॅटमध्ये चालवलं जात होतं तो फ्लॅट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांचा असल्याचं उघडकीस आल्यानं पोलीस आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 2, 2014, 03:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई पोलिसांनी एक सेक्स रॅकेट उधळून लावलंय. पण धक्कादायक बाब म्हणजे हे सेक्स रॅकेट ज्या फ्लॅटमध्ये चालवलं जात होतं तो फ्लॅट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांचा असल्याचं उघडकीस आल्यानं पोलीस आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून दोन महिलांची या जाळ्यातून सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांचा अंधेरीतल्या सोसायटीमध्ये फ्लॅट आहे. याच सोसायटीत अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही राहतात. हा फ्लॅट सिंग यांनी 4 वर्षापूर्वीपासून इंडियाबुल्स कंपनीला भाड्यानं दिला असून येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांचा करार संपणार असल्याचं डॉ. सिंग यांनी सांगितलं.
या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पूर्ण तयारीनिशी पोलिसांनी या फ्लॅटवर धाड टाकली. त्यावेळी तिथं एक तरुण आणि दोन महिला होत्या. त्यापैकी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचं नाव वकील शाह असून तो इंडियाबुल्सचाच कर्मचारी असल्याचं समजतं. स्थानिक कोर्टानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास समाजसेवा शाखेनं वर्सोवा पोलिसांकडे सोपवला आहे.
दुसरीकडे, इंडियाबुल्सनं वकील शाहला नोकरीवरून काढून टाकलं आहे. तो गेस्ट हाऊसचा केअरटेकर होता. परंतु, त्याच्या या धंद्यांबाबत कंपनीला काहीच कल्पना नव्हती, असा खुलासा कंपनीच्या प्रवक्त्यानं केला आहे.
हे सगळं असलं तरी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फ्लॅट असलेल्या सोसायटीत, साक्षात माजी पोलीस आयुक्तांच्या घरात सेक्स रॅकेट चालवलं जात असल्यानं त्यामागचा खरा सूत्रधार कोण, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.