www.24taas.com, मुंबई
गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असतानाच आता मुंबईतल्या ग्राहकांना 20-20 दिवस गॅस सिलेंडर मिळत नसल्याचं समोर आलंय. ग्राहकांना गॅस मिळत नसला तरी काळ्या बाजारात मात्र हा गॅस अकराशे रुपयांना मिळतोय. गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचं बिंग फुटल्यानं कुर्ला भागातील दुकानदाराने दुकान बंद करुन पळ काढला.
मुंबईच्या कुर्ला भागातल्या भारत गॅसच्या बंद असलेल्या सप्लाय सेंटरवर फरसाण, वेफर्स, बिस्किट फेकून निषेध व्यक्त करणा-या या राणी मखिजा. रजिस्ट्रेशन करुनही त्यांना गेल्या 20 दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळालेला नाही. गॅस मिळत नसल्यामुळं राणी मखिजांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळं वेफर्स, बिस्किटे खाऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्य आपली भूक भागवतायत. राणी मखिजांसारख्या शेकडो महिलांची हिच तक्रार आहे. 400 रुपयांचा गॅस 1100 रुपयांना काळ्या बाजारात विकला जात असल्याचा आरोप या महिलांनी केलाय.
गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत न झाल्यास तसंच त्याचा काळा बाजार बंद न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.
एकीकडं गॅस सिलेंडरच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ तर दुसरीकडं त्याचा चालणारा काळा बाजार. यामुळं सामान्य माणसाचं कंबरडं चांगलंच मोडलंय. त्यातच आता गॅसही मिळेनासा झाल्यानं जनतेवर उपासमारीची वेळ आलीय.