भाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!

मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर एलईडी दिव्यांऐवजी सोडियम लाईट्सच लावा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं बीएमसीला दिलेत. त्यामुळं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालंय.

Updated: Jul 3, 2015, 07:24 PM IST
भाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'! title=

मुंबई : मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर एलईडी दिव्यांऐवजी सोडियम लाईट्सच लावा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं बीएमसीला दिलेत. त्यामुळं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालंय.

मरीन ड्राईव्हवरच्या एलईडी लाईट्सचा हा वाद सुरू झाला जानेवारी महिन्यात... केंद्र सरकारच्या मदतीनं मरीन ड्राईव्हवर एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव भाजपनं महापालिकेच्या मुख्य सभेत मांडला. शिवसेनेनं त्याला विरोध केला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात हे दिवे बसवण्यात आले. मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. 

मात्र, आता या प्रकरणात शिवसेनेनं भाजपवर कुरघोडी केलीय. मरीन ड्राईव्हवर एलईडी लाईट्सऐवजी सोडियम लाईट्सच लावा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं बीएमसीला दिलेत. या निर्णयानंतर 'चुकीच्या पद्धतीनं लावलेल्या एलईडी दिव्यांमुळे मरीन ड्राइव्हची शोभाच गेली... मुंबईकरांची हीच भावना हायकोर्टानं व्यक्त केली, त्याबद्दल धन्यवाद... मी एलईडी दिव्यांच्या विरोधात नाही. पण मरीन ड्राइव्ह हे पर्यटनस्थळ आहे. मरीन ड्राइव्ह म्हणजे क्वीन्स नेकलेस... आता त्या नेकलेसला
पुन्हा झळाळी येईल' असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय. 

या ट्विटला काही वेळातच आशिष शेलारांनी ट्विटरवरून उत्तर दिलंय. 'हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी केवळ निरीक्षण नोंदवलं आहे. कोर्टाने कोणताही आदेश दिला असेल तर त्याचे पालन केले जाईल. संपूर्ण मुंबईत एलईडी दिवे लावावेत, असंही निरीक्षण
नोंदवण्यात येतंय' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

कोर्टाच्या या आदेशानंतर कोण, कुठे आणि कसले दिवे लावतं, याकडं मुंबईकरांचं लक्ष लागलंय.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.