यावेळीही विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चेहरे बदलणार नाहीत

( अमित जोशी, झी २४ तास, मुंबई ) स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या आठ जागांसाठी येत्या २७ डिसेंबरला निवडणूक होतेय. या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये याबाबत अद्याप साधी चर्चाही झालेली नाही.

Updated: Nov 25, 2015, 10:54 PM IST
यावेळीही विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चेहरे बदलणार नाहीत title=

मुंबई : ( अमित जोशी, झी २४ तास, मुंबई ) स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या आठ जागांसाठी येत्या २७ डिसेंबरला निवडणूक होतेय. या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये याबाबत अद्याप साधी चर्चाही झालेली नाही.

विधान परिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ १ जानेवारीला संपतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या या ८ जागांसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालाय.

या कार्यक्रमानुसार २ डिसेंबरला अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून, १० डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणाराय. १२ डिसेंबर अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्यानं त्यादिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. २७ डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार असून, ३० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. सध्या या आठपैकी एक जागा राष्ट्रवादी कांग्रेसकडे, 4 जागा काँग्रेसकडे, 2 जागा शिवसेनेकडे तर एका जागेवर अपक्ष आमदार आहे. निवृत्त होणा-या आमदारांमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे, काँग्रेसचे भाई जगताप, अमरीश पटेल, महादेव महाडिक आणि राजेंद्र मुळक, शिवसेनेचे रामदास कदम आणि गोपीकिसन बजोरीया, तर अपक्ष अरूणकाका जगताप यांचा समावेश आहे.

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी मावळत्या आमदारांसह अनेकांनी आपापल्या पक्षाकडं लॉबिंग सुरू केलंय. या निवडणुकीत स्थानिक नगरसेवक मतदान करणार असल्यानं प्रत्येक उमेदवाराला मतदानापर्यंत आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना सांभाळावं लागणाराय. 

काँग्रेस-राष्ट्रवादी ही निवडणूक आघाडी करून लढवतंय. तर शिवसेना-भाजपचा युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा एकही आमदार नाही. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधली गणितं वेगळी आहेत. तिथलं संख्याबळ वेगळं आहे. त्यामुळे सध्याच्या विधान परिषदेतील पक्षीय संख्याबळावर फारसा फरक पडणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.