मुंबई : छगन भुजबळांची दातदुखी ही छातीच्या दुखण्यात कशी रूपांतरत झाली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोमवारी, दात दुखण्याच्या सबबीखाली आर्थर रोड कारागृहातून, भुजबळ मुंबईतल्या शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयात उपचारासाठी गेले होते. मात्र, तिथून भुजबळ थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात कसे पोहोचले? यावरुन उलटसुलट चर्चा सुरु होत्या.
त्यामुळे खरोखरच भुजबळांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवत होता की तुरुंगातल्या त्रासापासून त्यांची काही काळ सुटका व्हावी, यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांच्या संगनमताने रचलेला हा बनाव होता का? याची खातरजमा करण्यासाठी ही चौकशी करण्यात येणार आहे.
तुरुंग प्रशासनाच्या अतिरिक्त महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.