खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही : मुख्यमंत्री

खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये 'भारत माता की जय' बोलण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घातला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. 

Updated: Apr 4, 2016, 04:40 PM IST
खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही : मुख्यमंत्री title=

मुंबई : खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये 'भारत माता की जय' बोलण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घातला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. 

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध 

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

कालदेखील म्हटलं होतं, आजही म्हणू - मुख्यमंत्री

विरोधक जाणूनबुजून गोंधळ घालत आहेत, मतांचं राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री पद असो किंवा नसो 'भारत माता की जय' बोलावेच लागेल. 'भारत माता की जय' कालदेखील म्हटलं होतं. आजही म्हणू असं मुख्यमंत्री या गोंधळात बोलत होते.

तुम्ही मुख्यमंत्री की आरएसएस कार्यकर्ते - पृथ्वीराज चव्हाण 

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना आरएसएस कार्यकर्ता म्हणून बोललात की, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असा खोचक सवालही यावेळी विचारला. मी जाती धर्मावर बोललेलो नाही, देशाबद्द्ल बोललेलो आहे. ज्या लोकांचं देशावर प्रेम नाही, जे लोक मुद्दामुन वाद वाढवत आहेत त्यांना उद्देशून बोललो असल्यांच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये बोलताना 'भारत माता की जय बोलण्यास नकार देणाऱ्यांना देशात राहण्याचा हक्क नसल्याचं म्हटलं होतं, या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता.