कंपनीची महिला कर्मचाऱ्यांना स्कर्टची सक्ती!

मुंबईतील एका कार डीलर कंपनीने आपल्या टेलिफोन ऑपरेटरवर स्कर्ट आणि टॉप परिधान करण्याची सक्ती केली आहे. ऑफिसमध्ये स्कर्ट आणि टॉप घालणार नसल्यास तिने राजीनामा द्यावा असंही कंपनीने म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 9, 2013, 06:06 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईतील एका कार डीलर कंपनीने आपल्या टेलिफोन ऑपरेटरवर स्कर्ट आणि टॉप परिधान करण्याची सक्ती केली आहे. ऑफिसमध्ये स्कर्ट आणि टॉप घालणार नसल्यास तिने राजीनामा द्यावा असंही कंपनीने म्हटलं आहे. या सक्तीविरोधात संबंधित मुलीने पोलीसांकडे धाव घेतली आहे.
कंपनीचा ड्रेसकोड स्कर्ट आणि टॉप असा आहे. टेलिफोन ऑपरेटर मुलगी २०१० पासून या ठिकाणी काम करते. ती नेहेमी सलवार कमीझ घालून येते. मात्र तिने असे कपडे न घालता स्कर्ट आणि टॉपच घालावा असं फर्मान कंपनीने काढलं. जर असे कपडे घालायचे नसतील, तर राजीनामा दे अशी जबरदस्तीही तिच्यावर करण्यात आली आहे. जर स्कर्ट घालणं कंपनीच्या नियमांत असेल, तर तशी लेखी सूचना कंपनीने द्यावी असं तरुणीचं म्हणणं आहे.

या तरुणीने कंपनीविरोधात पोलीसांकडे धाव घेतली. तसंच, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. या मुलीच्या म्हणण्यानुसार ती मुस्लिम असल्याने ती असे कपडे घालू शकत नाही. तिच्या समर्थनार्थ जमायत-ए-उलेमा-ए-महाराष्ट्र उतरली आहे. कंपनीला कामाशी मतलब असावा, कपड्यांशी नाही असं या संघटनेचं म्हणणं आहे.