CMची कोंडी करत विरोधकांना हवाय, 'अखंड महाराष्ट्राचा ठराव'

अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर विरोधकांनी शिवसेनेला बरोबर घेत भाजपची आणि मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही विरोधक आणि शिवसेनेचे समाधान झालेले नाही. त्यांना अखंड महाराष्ट्राचा ठराव हवा आहे.

Updated: Aug 2, 2016, 10:38 PM IST
CMची कोंडी करत विरोधकांना हवाय, 'अखंड महाराष्ट्राचा ठराव' title=

दीपक भातुसे, मुंबई : अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर विरोधकांनी शिवसेनेला बरोबर घेत भाजपची आणि मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही विरोधक आणि शिवसेनेचे समाधान झालेले नाही. त्यांना अखंड महाराष्ट्राचा ठराव हवा आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशी अखंड महाराष्ट्राच्या मुद्याचे पडसाद उमटले. शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत अखंड महाराष्ट्राचा ठराव विधिमंडळात आणावा, अशी मागणी केली. विरोधी  पक्षांनीही मागील तीन दिवस हिच मागणी लावून धरली होती. विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच याच मुद्यावर विरोधकांबरोबरच शिवसेना आमदारही आक्रमक होते. 

शिवसेनेबरोबरच विरोधकांचा गोंधळ सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी आक्रमकपणे उत्तर देत विरोधकांना आणि शिवसेनेलाही शांत करण्याचा  प्रयत्न केला. राज्य विभाजनाचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर शिवसेना अचानक बॅकफूटवर गेली आणि शिवसेनेचे आमदार विधानसभेत शांत बसले. विरोधक मात्र अखंड महाराष्ट्राच्या ठरावावर आक्रमक होते. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मागणीसाठी अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेतली आणि वेलमध्ये बसून ही मागणी लावून धरली. 

दुसरीकडे विधानपरिषदेत या मुद्यावर विरोधक चांगलेच आक्रमक दिसले. जोपर्यंत मुख्यमंत्री विधानपरिषदेत येऊन अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडत नाहीत, तोपर्यंत विधानपरिषदेचे कामकाज चालू देणारर नाही, अशी भूमिका विरोधकांनी विधानपरिषदेत घेतली.

एकीकडे विधिमंडळात हे नाट्य घडत असताना शिवसेनेचे काही ज्येष्ठ मंत्री याबाबत काय भूमिका घ्यायचे याचे मार्गदर्शन घेण्यासाठी थेट मातोश्रीवर पोहोचले. उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करून विधानभवनात परतलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांची याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा झाली. 

भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व आघाडी झालेली पहायला मिळाली. या बैठकीनंतर शिवसेनेने अखंड महाराष्ट्राच्या  ठरावाबाबत भूमिका ठरवण्यासाठी वेळ मागून घेतला. या सगळ्या गोंधळात विधानसभेचे कामकाज संपले आणि अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्याचे विरोधकांचे मनसूबे सध्यापुरते तरी उधळले गेले.

अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्याबाबत आक्रमक असलेली शिवसेना अचानक या मुद्यावर शांत का बसली अशी चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु होती. त्यामुळे वाघाची शेळी झाल्याची टीका विरोधकांनी शिवसेनेवर केली. दिवसभरात शिवसेनेने अखंड महाराष्ट्राच्या ठरावाबाबत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे याबाबत शिवसेना पुढे काय भूमिका घेणार याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.