नव्या नियमानुसार डान्सबार मालकांचा 'तारेवरचा डान्स'

शहरात अजून तरी छमछम सुरू होणार नसल्याचं दिसून येत आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठविली आहे, मात्र तरीही मुंबई पोलिसांकडे डान्सबारच्या परवान्यासाठी केवळ १५० अर्ज आले आहेत, मात्र यापैकी अद्याप एकालाही परवाना देण्यात आलेला नाही.

Updated: Dec 30, 2015, 05:42 PM IST
नव्या नियमानुसार डान्सबार मालकांचा 'तारेवरचा डान्स' title=

मुंबई : शहरात अजून तरी छमछम सुरू होणार नसल्याचं दिसून येत आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठविली आहे, मात्र तरीही मुंबई पोलिसांकडे डान्सबारच्या परवान्यासाठी केवळ १५० अर्ज आले आहेत, मात्र यापैकी अद्याप एकालाही परवाना देण्यात आलेला नाही.

सरकारने कठोर अटींची मेक मारल्याने, आलेल्या अर्जापैकी २० अर्ज रद्द झाले आहेत, ७० अर्जांची छाननी सुरू आहे, तर उर्वरित ६० अर्जदाराना २६ अटींची पूर्तता करण्यास सांगण्यात आलेले आहे.

'डान्सबारसाठी २६ अटी घातलेल्या आहेत. अर्जदाराने तो या अटींच्या पूर्ततेस सक्षम आहे का, याचा स्वत: आढावा घेऊन, तसे लेखी देणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही निरीक्षकामार्फत लेखा परीक्षण करून संबंधितास परवाना देणार आहोत. अद्याप अटींच्या पूर्ततेसह एकही अर्जदार पुढे आलेला नाही,’ असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.

डान्सबारना तुम्ही सरसकट बंदी करू शकत नाही. मात्र, तेथे काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अटी मात्र जरूर घालू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविताना स्पष्ट केले आहे, त्यानुसार काही अटी लावण्यात आल्या आहेत.

डान्सबारसाठी काही अर्ज अशा व्यक्तींच्या नावे होते, ज्यांच्याकडे यापूर्वी परवाना होता. मात्र, ती व्यक्ती आता हयात नाही. काही प्रकरणांत बार ज्या सोसायटीत आहे, तेथील रहिवाशांचे ना हरकत प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे हे अर्ज रद्द करण्यात आले. 

७० अर्जांची छाननी सुरू आहे. अटींची पूर्तता करण्यास अर्जदारांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे, या मुदतीत अटींची पूर्तता न केल्यास त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

डान्सबारच्या नव्या अटी

डान्सबारमध्ये सीसीटीव्हा अनिवार्य.

बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत.

स्टेजवर एका वेळी चारपेक्षा अधिक बारबाला हजर नसतील.

स्टेज आणि प्रेक्षक यांच्यात विशिष्ट सुरक्षित अंतर ठेवावे लागेल.

प्रेक्षकांपैकी कोणालाही स्टेजवर जाता येणार नाही.

नर्तकींना अश्लील वा बीभत्स हावभाव करता येणार नाही.

पाच ग्राहकांच्या टेबलमागे एक पार्किंगची जागा बारमालकास ठेवावी लागेल.

डान्स बारमध्ये धूम्रपान करता येणार नाही.

पोलीस या बारवर कधीही छापे टाकू शकतील.