मुंबईत कोटीची दहीहंडी...आमदारांमध्ये चढाओढ बक्षिसांची

दहीहंडीच्या उंचच उंच थरांवरून अनेक `गोविंदा` आमदार थेट विधानसभेत पोहोचले... मात्र आता आमदारकीचे लोणी इतर कुणा माखनचोराने लुटू नये, यासाठी काळजी घेण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. मुंबईत प्रथमच कोटीच्या घरात गोविंदाची रक्कम गेली आहे. तर मनसे आमदारांमध्ये चढाओढ दिसून येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 28, 2013, 04:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दहीहंडीच्या उंचच उंच थरांवरून अनेक `गोविंदा` आमदार थेट विधानसभेत पोहोचले... मात्र आता आमदारकीचे लोणी इतर कुणा माखनचोराने लुटू नये, यासाठी काळजी घेण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. मुंबईत प्रथमच कोटीच्या घरात गोविंदाची रक्कम गेली आहे. तर मनसे आमदारांमध्ये चढाओढ दिसून येत आहे.

दहीहंडीनं अनेकांना ग्लॅमर मिळवून दिलं... त्यात सेलिब्रिटी होते, तसेच राजकारणीही होते... गल्लीबोळात, रस्त्यारस्त्यांवर दहीहंड्या बांधता बांधता त्यापैकी काहीजण आधी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले... आणि तिथून त्यांनी चक्क विधान भवनाची वाट धरली... त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणा-यांना आता दहीहंडीचा उत्सव म्हणजे मटका वाटू लागलाय... त्यामुळे अर्थातच स्पर्धा वाढलीय... लाखाची बात आता जुनी झालीय, यंदा एक कोटींच्या दहीहंडीचं आयोजन करुन शिवसेनेचे पदाधिकारी अजय बडगुजर एकदम प्रकाशझोतात आलेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत तेही आमदारकीच्या तिकिटासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जातं. यंदा घाटकोपरमध्ये मनसे आमदार राम कदम यांना त्यांच्याच पक्षातून आव्हान देण्यात येतंय. महापालिका निवडणुकीचा अनुभव गाठिशी असलेल्या गणेश चुक्कल यांनीही त्यठिकाणी लाखोंच्या हंडीचं आयोजन केले आहे.
या हंडीवरून घाटकोपरमध्ये पोस्टरयुद्ध रंगले आहे. एक्कावन लाखांची बक्षीसं आणि बॉलीवूड स्टार ह्रतिक रोशन यांच्यासह अनेक सिनेकलावंतांना आमंत्रित करुन चुक्कल यांनी सध्यातरी बाजी मारल्याचं दिसंतय. तर राम कदम यांनी अजून आपले पत्ते उघडलेले नाहीत.
एकीकडे आमदारकीचं लोणी मटकावण्यासाठी ही परिस्थिती असताना दुसरीकडे विद्यमान आमदारांना आपली वोटबँक टिकवण्यासाठी मतदारसंघातल्या दहीहंडीवर लक्ष केंद्रित करावं लागतंय... शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळा नांदगावकर यांनी यंदा स्वतःच्या गोविंदा पथकासह फिरण्यापेक्षा दहीहंडी उत्सव आयोजनाकडे लक्ष देण्याचं ठरवलंय... सत्तावीस लाखांचं घसघशीत बक्षीस जाहीर करुन त्यांनी आपली हंडी चर्चेत आणलीय.

मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी या भागात चोर गोविंदाचं आयोजन करून आपल्या महत्त्वाकांक्षेला बळ देण्याचा प्रयत्न केलाय. वरळीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर गेल्या कित्येक वर्षांपासून जांबोरी मैदानात दहीहंडीचा इवेन्ट करतायत... बॉलीवूडच्या स्टार कलावंतासंह किंग खान शाहरुखची उपस्थिती हे त्यांच्या हंडीचं यंदाचं आकर्षण असणार आहे.

दहीहंडीच्या थरांवरून विधानसभा गाठण्याचा राजमार्ग अनेकांनी यशस्वी करून दाखवला. त्यामुळं इतरांनाही याच मार्गावरून जाण्याचा मोह आवरत नाहीय... त्यासाठी वाट्टेल तेवढा खर्च करण्याची त्यांची तयारी आहे... त्यापैकी कितीजण ही हंडी फोडतात आणि कितीजण खाली कोसळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.