अंध तरुणीचा 'डॉक्टर' बनण्याचा प्रवास...

डॉक्टर व्हायचंच, हे तिनं निश्चित केलं होतं... तिच्या वाटेत अनेक अडचणी आल्या... तरी ती डगमगली नाही... तिच्या बाबतीत नियतीनं वेगळेच फासे टाकले होते. पण जिद्दीनं तिनं नियतीलाही हरवलं...

Updated: Jan 25, 2017, 03:40 PM IST
अंध तरुणीचा 'डॉक्टर' बनण्याचा प्रवास...  title=

प्रवीण नलावडे, मुंबई : डॉक्टर व्हायचंच, हे तिनं निश्चित केलं होतं... तिच्या वाटेत अनेक अडचणी आल्या... तरी ती डगमगली नाही... तिच्या बाबतीत नियतीनं वेगळेच फासे टाकले होते. पण जिद्दीनं तिनं नियतीलाही हरवलं...

डॉ. कृतिका पुरोहित.... कृतिकाचा डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास भन्नाट आहे...  कृतिका अवघ्या आठ वर्षांची होती... त्यावेळी ऑप्टिकल नर्व्ह डॅमेज म्हणजे तिच्या डोळ्यांच्या नसांना इजा झाली आणि तिची दृष्टी गेली... नॅशनल असिस्टंट फॉर द ब्लाईंड - नॅबच्या मदतीनं कृतिकानं मुंबईमधल्या डीपीएम स्कूलमधून दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. दहावी पास झाल्यानंतर तिला अकरावी सायन्सला अॅडमिशन घेण्यासाठीही कॉलेज व्यवस्थेबरोबर संघर्ष करावा लागला. अखेर कॉलेजनं कृतिकाच्या जिद्दीपुढे माघार घ्यावी लागली.

कृतिकाला बारावीनंतर फिजिओथेरपी या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा द्यायची होती. मात्र, अंध असल्याने तिला सीईटीसाठी प्रवेश नाकारण्यात आला. त्या विरोधात कृतिकानं उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने कृतिकाच्या बाजूनं निर्णय दिला आणि सीईटीत दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या प्रवर्गाच्या गुणवत्ता यादीत कृतिका पहिल्या दहात आली. 

फिजिओथेरपी या अभ्यासक्रमात लेखी आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षांचा समावेश असल्यानं तिला पुन्हा प्रवेश नाकारण्यात आला. या विरोधात कृतिकाने पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावेळीही न्यायालयाने तिच्या बाजूने निर्णय देत तिला प्रवेश दिला जावा, असे आदेश दिले.

त्यानंतर कृतिकानं मुंबईमधल्या  जीएस मेडिकल महाविद्यालयातून फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत पूर्ण केला. आता कृतिका एका खासगी रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट ऑब्झर्वर आहे.

अंध आणि अपंगात डॉक्टर बनणारी कृतिका पहिली जरी नसली तरी ती महाराष्ट्र OTPT (Occupational/Physical Therapy)मध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून रजिस्टर होणारी, देशातली पहिली महिला डॉक्टर आहे. कृतिकाच्या मार्गात अनेक अडचणी आल्या, पण ती खचली नाही, ती सगळ्याला पुरून उरली... सलाम तिच्या जिद्दीला...