राष्ट्रवादीचा डुप्लिकेट प्रवेश सोहळा

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्याने भास्कर जाधव यांची निवड झाली. त्यांनी कामाला धडाका लावण्यास सुरूवात करण्याचा विडा घेतला. मात्र, त्यांच्या पहिल्याच उपस्थितीत राष्ट्रवादीचा डुप्लिकेट प्रवेश सोहळा पाहायला मिळाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डुप्लिकेट ‘हिरों’चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 21, 2013, 04:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्याने भास्कर जाधव यांची निवड झाली. त्यांनी कामाला धडाका लावण्यास सुरूवात करण्याचा विडा घेतला. मात्र, त्यांच्या पहिल्याच उपस्थितीत राष्ट्रवादीचा डुप्लिकेट प्रवेश सोहळा पाहायला मिळाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डुप्लिकेट ‘हिरों’चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अजित पवार म्हणजे टगेगिरी. त्यांनी तसं जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमात मराठी कलाकार आणि सिने कलावंताना तंबी दिली होती. ‘अशा कलाकारांचा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल’ अशी तंबीही त्यांनी कलावंतांना दिली होती. त्याच अजितदादांनी आज आपला राग डुप्लिकेट कलावंतांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन शांत केला.
नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, राजेश खन्ना, शशी कपूर, गोविंदा, सैफ अली खान, मिथुन चक्रवर्ती असे मिळून जवळपास पंधरा डुप्लिकेट कलाकारांनी राष्ट्रवादी कार्यालयात पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादीत दाखल झालेले, सारे कलाकार गरिबीतून वर आले आहेत. त्यांना पक्षाकडून हवी ती मदत दिली जाईल असे सांगत अजित पवारांनी त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे सांगितले. दरम्यान, पक्षप्रवेश झाल्यानंतर रंगला तो या कलाकारांच्या मिमिक्रीचा कार्यक्रम. कार्यालयात टाळ्यांचा कडकडाट होत होता, पण स्वरूप होते ऑर्केस्ट्रामधील मिमिक्रीचेच. राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गजभिये यांनी या कलाकारांच्या पक्षप्रवेशासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादीचा डुप्लिकेट सोहळा मात्र मंत्रालय परिसरात चांगलाच चेष्टेचा विषय बनला होता. भास्कर जाधवांची डुप्लिकेट राष्ट्रवादी आणि अजित पवारांची डुप्लिकेट टगेगिरी, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.