मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठीची डेस्कटॉपची संकल्पना मोबाईल अॅप्लिकेशनमुळे मागे पडणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या स्मार्टफोनमुळे महावितरणने वीज बिल भरण्याचा पर्याय मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देण्याचे ठरवले आहे. येत्या एक एप्रिलपासून हे ऍप्लिकेशन सुरू करण्याचा महावितरणचा मानस आहे.
डेटा कनेक्शनमधील स्वस्त पर्याय आणि परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोनमुळे अनेक ग्राहक ऑनलाइन पर्यायाकडे वळत आहेत. त्यामुळेच महावितरणने अशा स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी हा पर्याय देऊ केला आहे. बिल भरण्यासोबतच बिलावरील नावात बदल, वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी, सेवांबाबतच्या सूचना, अभिप्राय, तक्रारी, बिल पेमेंटच्या अडचणी आदी यातून मांडण्याची सुविधा मिळेल. ग्राहकांचा ऑनलाइन सेवांसाठीचा अभिप्राय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ग्राहकांकडून येणाऱ्या अभिप्रायांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार सेवांमध्ये सुधारणा करण्याचा मानस आहे, असे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे महाव्यवस्थापक योगेश गडकरी यांनी सांगितले. ग्राहकांचा अभिप्राय त्यामुळेच ओपन एंडेड स्वरूपाचा ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांच्या तक्रार निवारणातून वीजदेयकाच्या तक्रारी, तक्रार निवारणाचे व्यवस्थापन, तक्रारीचे स्वरूप आणि उपलब्ध उपाययोजना यांची अंमलबजावणी यासाठीची कार्यपद्धती निश्चित करीत आहोत, असे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता यांनीही नुकतेच स्पष्ट केले होते.
वेबसाईटही नव्या स्वरूपात
महावितरणची वेबसाईट नव्या स्वरूपात काही दिवसांत दिसणार आहे. केंद्र सरकारच्या वेबसाईटच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महावितरणच्या साईटचा कायापालट होईल. सध्या वीज बिल ऑनलाइन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची भिस्त वेबसाईटवर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.