मुंबई: काळबादेवी आग दुर्घटनेत मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील तीन अधिकारी शहीद झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या समस्यांचा विषयही ऐरणीवर आलाय. ३४ हजार कोटींचं बजेट असणारी मुंबई महापालिका अत्यंत महत्वाच्या असणाऱ्य़ा या विभागाकडं दुर्लक्ष करत आलीय. अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगपासून ते त्यांच्या ओव्हरटाईमच्या भत्त्यापर्यंत असे अनेक प्रश्न आहेत. ज्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज निर्माण झालीय.
अंधेरीच्या लोटस बिंल्डिंगला लागलेली आग... आत अग्निशमन कर्मचारी अडकले होते. परंतु त्यांना वाचवण्यासाठी आत जाण्याचं धाडस तेव्हा कोणीही केलं नव्हतं... काळबादेवीतील गोकुळ निवासाला लागलेली आग. आतमध्ये कोणीही अडकलेले नसतानाही बिल्डींगमध्ये चार अधिकाऱ्यांचा प्रवेश. दोन्ही घटनांमध्ये विरोधाभास असला तरी लोटसच्या घटनेत एकाचा तर काळबादेवीच्या घटनेत तिघांचा मृत्यू. दोन्ही घटनांमध्ये झालेल्या जवानांचे मृत्यू हे निकृष्ट दर्जाच्या साधनांमुळं नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळं झालेत आणि कोणतंही नियोजन नसल्यामुळं हे चुकीचे निर्णय घेतले गेले.
मुंबई अग्निशमन दलाकडं स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजरच नसल्यानं नियोजनाचा अभाव दिसून येतो. एखाद्या बिल्डींगला आग लागल्यानंतर त्या बिल्डिंगची इंत्यंभूत माहिती यांच्याकडं नसते. त्यामुळं तिथं गेल्यानंतर कोणी काय करावे, कशा पद्धतीनं आग विझवावी. याचं नियोजन नसतं.
अग्निशमन कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जात नाही. तसंच सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या सहा महिन्यांच्या प्रशिक्षाणातही प्रत्यक्ष आग विझवण्याचं प्रशिक्षण दिलं जात नाही. प्रशिक्षणाचा खास असा अभ्यासक्रमच अग्निशमन दलाकडं नाहीय. आगीचे प्रकार बदलत आहेत, जसं काचेच्या इमारतीतील आग, केमिकलची आग आणि त्यापासून निर्माण होणारे विषारी वायू. यासाठी अद्यावत प्रशिक्षण दिलं जात नाही. रोज केवळ परेड घेण्यापेक्षा मॉक ड्रिलवर भर देणं आवश्यक आहे. समुद्रातील लोकांना वाचविण्यासाठी फ्लड एन्ड रेस्क्यू टीमला गोव्यात प्रशिक्षण देण्यात आलं. परंतु धक्कादायक म्हणजे त्यांना तिथं स्विमिंग पूलमध्ये प्रशिक्षण दिलं गेलं. खर्चात कपात करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला केवळ ५० तासांपर्यंतचाच ओव्हरटाईम दिला जातो. त्याचा आर्थिक फटका कर्मचाऱ्यांना बसतो.
अग्निशमन दलात अडीचशे पदे भरण्याची बाकी आहेत. तसंच अधिकाऱ्यांना तर २४ तास काम करावं लागतं. रिस्क पे, धुलाई भत्ता असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांचे आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.