मुंबई महापालिकेला २८५३ कोटींचा गंडा!

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणा-यां मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Updated: Feb 2, 2013, 04:16 PM IST

www.24taas.com, झी २४ तास, हेमंत बिर्जे, मुंबई
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणा-यां मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ऑडीट विभागानंच ही पोलखोल केलीयं. महापालिकेच्या २६ विभागांत १ लाख ३८ हजार ५२२ ऑडीट नोट्स अनुत्तरित असल्य़ाचं उघड झालंय. त्यामुळे पालिकेचे तब्बल २८५३ कोटी बुडाल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलंय. सत्ताधा-यांनी कंत्राटदारांशी युती केल्याचा आरोप करत विरोधकांनी सेना-भाजपवर हल्लाबोल केलाय.
मुंबई महापालिकेला तब्बल २८५३ कोटींचा चुना लागलाय. हे कोट्यवधी रूपये बिल्डर लॉबी आणि कंत्राटदारांनीच बुडवल्याचं पालिकेच्या ऑडीट विभागानं समोर आणलंय. मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद मांडण्यासाठी दरवर्षी ऑडीट नोट काढली जाते. १९९५ ते २०१२ पर्यंन्त ५१ ऑडीट रिपोर्ट मधील १ लाख ३८ हजार ५२२ ऑडीट नोटची उत्तरं लालफितीत दडवले गेले आहेत. या रिपोर्टनुसार कंत्राटदार,बिल्डराकडून दंडाची २८५३ कोटी रुपयांची रक्कम वसूलच केली गेलेली नाही.
डिपार्टमेंन्ट ऑडीट नोटस दंडाची रक्कम
बिंल्डिग प्रपोजल ५३२ बिल्डराना दंड ९७ कोटी
सिंमेट रोड्स ४८३ कंत्राटदाराना दंड २८५ कोटी
अस्फाल्ट रोड्स ४६३ कंत्राटदाराना दंड १११ कोटी
सिव्हिल वर्क कॉन्ट्रक्ट ३१६६ कंत्राटदाराना दंड १०६ कोटी
वॉटर डिपार्टमेन्ट १७,८९३ग्राहकांना दंड १२७३ कोटी
बेस्ट ४००८ग्राहकांना दंड १०६७ कोटी

या २६ विभागाच्या ऑडीट रिपोर्टमध्ये पालिकेच्या आर्थिक व्यवहारांचं भिंग फुटलयं. १९९५ ते २०१२ पर्यंत पालिकेत सत्ता उपभोगणा-या शिवसेना-भाजप युतीचा भ्रष्टाचार या रिपोर्टमुळे उघड झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलायं. विरोधी पक्षांच्या आरोपांना उत्तर देत या सगळ्या कारभाराला पालिका प्रशासन जबाबदार असल्याच सांगत सेना-भाजप युतीनं प्रशासनाकडे चेंडू टोलवलाय.

या ऑडीट रिपोर्टमधून सत्ताधारी आणि पालिका प्रशासनानं संगनमत करून बिल्डर आणि कंत्राटदारांना पाठिशी घातल्याचं स्पष्टपणे समोर आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळे या सर्व प्रकाराची खोलात जाऊन चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागलीये.