www.24taas.com, मुंबई
नितेश राणे म्हणजे एक वादातलं नाव. मुंबईत काढलेल्या हंडा मोर्चावेळी झालेली हाणामारी असेल किंवा पार्किंगमध्ये घातलेला गोंधळ... अशा विविध गोष्टींमुळे हे नाव कायमच चर्चेत राहिलं. मधल्या काळात बेरोजगारांना रोजगार देण्याचा महाप्रकल्पही त्यांनी घोषित केला. १ लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं.
त्यानंतर त्यांनी नाट्यरसिकांसाठीही एक योजना जाहीर केली. आता नितेश राणे स्वतः नाटकाच्या निर्मितीत उतरलेत आणि नाटकासाठी त्यांनी विषय घेतलाय बेळगावचा सीमाप्रश्न. दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा नवा सिनेमा `प्रेमाची गोष्ट` प्रदर्शित झाला आहे आणि त्याचं जोरदार कौतुक होतं आहे. मग नितेश राणेंच्या मनात आलं, की अतुलचं कुटुंब बेळगावचं... त्यामुळे त्यालाच या नाटकात घेतलं तर? मात्र अतुलनं नकार दिला. नकार पचवायला जमेल, तर ते नितेश राणे कसले? रागाच्या भरात त्यांनी केला एक ट्विट...
`अतुल कुलकर्णीनं `झालाच पाहिजे`मध्ये काम करण्यास नकार दिला... अतुल हा आपल्या स्वतःच्या बेळगावचा आहे... त्याला महाराष्ट्रीय म्हणायची लाज वाटते... त्याचा नवा सिनेमा `प्रेमाची गोष्ट`चं नाव `गद्दारची गोष्ट` असं केलं पाहिजे.`
आता या नाट्याचा पुढचा अंक म्हणून `प्रेमाची गोष्ट` थिएटरमधून खाली उतरवली गेली नाही, म्हणजे मिळवलं... नितेश राणेंनी आपल्या नाट्यप्रेमाचा झेंडा अवघ्या महाराष्ट्रभर फडकावला आहेच. पण बेळगावच्या विषयावर नाटक करण्याची त्यांची योजना अभिनंदनास पात्र आहे. इतर रसिकांप्रमाणे आम्हीही या नाटकाची आतुरतेनं वाट बघतोय. पण अतुल कुलकर्णीच्या विरोधात केलेला ट्विट हा प्रसिद्धीतंत्राचा तर भाग नाही ना, अशीही चर्चा नाट्य वर्तुळात आहे...