उंदरानं कुरतडलं... दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू

उंदरानं एका बाळाचा बळी घेतलाय. दहिसरच्या गणपत पाटील नगरात अवघ्या ४५ दिवसांच्या बालिकेचा चेहरा उंदरानं कुरतडला. त्यातच बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 3, 2013, 08:24 AM IST

www.24taas.com, मुंबई
उंदरानं एका बाळाचा बळी घेतलाय. दहिसरच्या गणपत पाटील नगरात अवघ्या ४५ दिवसांच्या बालिकेचा चेहरा उंदरानं कुरतडला. त्यातच बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
साक्षीचा सव्वा महिन्यापूर्वीच जन्म झाल्यानं यादव कुटुंबीय आनंदात होते. पण तेवढ्यातच त्यांच्या घरात विचित्र घटना घडली आणि सगळा आनंदच हिरावून नेला. यादव यांच्या घरात शिरलेल्या उंदरानं साक्षीचा चेहरा कुरतडला आणि त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. साक्षी रात्री झोपली असताना उंदरानं तिचा चेहरा कुरतडला. पहाटे तिच्या आईला जाग आली, त्यावेळी ही घटना उघड झाली. या विचित्र घटनेनं दहिसरच्या गणपत पाटील नगरात शोककळा पसरलीय. यानंतर तात्काळ लहानग्या साक्षीला भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिचा मृत्यू झाला होता. याच भगवती रुग्णालयात १४ नोव्हेंबर रोजी साक्षीचा जन्म झाला होता आणि तिथंच तिचा दुर्दैवी मृत्यूही झाला.

भगवती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पोस्ट मॉर्टेम अहवालात मृत्यूचे कारण न्यूमोनिया असल्याचे स्पष्ट केलंय. उंदरांनी साक्षीचा चेहरा कुरतडताना साक्षी रडली का नाही? असा सवाल पोलिसांनी पडला होता. न्यूमोनियामुळे आलेल्या बेशुद्धीतच घुशीने देह कुरतडल्यामुळे ती रडली नसावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.