मुंबई : किरण मेहता या धाडसी तरूणीला ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश, रेल्वेला उच्च न्यायालयाने दिले आहेत. या तरूणीची बॅग चोरणाऱ्या चोराशी झटापट झाली होती, त्या दरम्यान चोराने तिला चालत्या रेल्वेतून खाली खेचल्याने तिच्यावर पाय गमावण्याची वेळ आली होती.
किरण मेहताला चोराशी झटापट करण्याची काय गरज होती, तसेच हा अपघात उत्तर रेल्वेच्या क्षेत्रात झाल्याचं सांगून रेल्वेने मदत नाकारली होती.
प्रवासादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास प्रवाशांना चार लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची रेल्वे कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे रेल्वे आपली ही जबाबदारी झटकू शकत नाही, असे ठणकावत किरण मेहता या तरुणीला तात्काळ चार लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी रेल्वे प्रशासनाला दिले.
चोरलेली बॅग परत मिळवताना चोराशी झालेल्या झटापटीत आणि त्यानंतर गाडीतून खाली पडलेल्या किरणला पाय गमवावा लागला होता. त्यामुळे नुकसानभरपाईच्या रक्कमेव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कमही तिला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अंबाला येथून मुंबईला किरण परतत असताना ही घटना घडली. तिने चोराचा पाठलाग केला व त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली. चोराने त्यानंतर बचावासाठी गाडीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळेस त्याने किरणलाही स्वत:सोबत खेचले. या अपघातात किरणला पाय गमवावा लागला. त्यामुळे तिने अॅड्. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
भाविकाला चार वर्षानंतर न्याय मिळाला ( हा व्हिडीओ १० जून २०१२ चा आहे)